22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रऔषध कंपनीत स्फोट, १ ठार

औषध कंपनीत स्फोट, १ ठार

नागपूर : प्रतिनिधी
नागपूरच्या भीलगाव येथील अंकित पल्प्स अँड बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड या औषधनिर्मिती कंपनीच्या युनिटमध्ये मंगळवारी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत एका कर्मचा-याचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत.

स्फोट सकाळी सुमारे ११ वाजता झाला असल्याची माहिती आहे. कंपनीतील ‘ग्लास-लाइन्ड रिएक्टर’मध्ये अचानक स्फोट होऊन मोठा आगीचा भडका उडाला. या घटनेत एक व्यक्ती जागीच ठार झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना कामठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

अंकित पल्प्स अँड बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मायक्रोक्रिस्टलाइन सेलुलोज तयार करते. टउउ औषधनिर्मिती आणि खाद्य उद्योगात वापरली जाते. या कंपनीचे उत्पादन मुख्यत: औषधांच्या आणि खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी आवश्यक असते.

स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा तपास सुरू केला असून, ‘ग्लास-लाइन्ड रिएक्टर’मध्ये कोणत्या कारणामुळे स्फोट झाला याचा शोध घेत आहेत. कंपनीतील सुरक्षा उपायांचीही तपासणी केली जात आहे.

ही घटना एक वर्षांपूर्वी, १७ डिसेंबर २०२३ रोजी नागपूरच्या बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटाच्या आठवणी ताज्या करते. त्या दुर्घटनेत ९ कर्मचा-यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सुरक्षा उपायांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नागपूरचे पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. प्राथमिक तपासानुसार, स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. प्रशासनाने जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR