भोपाळ : वृत्तसंस्था
मध्य प्रदेशात ज्या कफ सिरपमुळे २६ मुलांचा जीव गेला, त्यावरून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी भाजप सरकारवर मोठा हल्लाबोल केला. या कंपन्यांकडून भाजपला निवडणुकीत देणगी दिली जाते. सिरप बनविणा-या कंपन्यांनी भाजपला तब्बल ९४५ कोटी रुपये देणगी दिली होती. त्यामुळेच चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणा-या औषध कंपनीवर सरकारने कारवाई केली नाही, असा खळबळजनक आरोप केला आहे.
यासंदर्भात दिग्विजय सिंह यांनी भोपाळमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. २ सप्टेंबरपासून आतापर्यंत २६ मुलांचा जीव कफ सिरपने घेतला. ज्यात डायएथलीन ग्लाईकॉलचे प्रमाण ४८.६ टक्के होते. याचे सुरक्षित प्रमाण ०.०१ टक्के इतके असायला हवे होते. आता तपासात जर सिरपमध्ये विषारी रसायन मिसळल्याचे सिद्ध झाले असेल तर आरोग्य मंत्र्यांनी त्यांच्या पदावर का राहायला हवे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ज्या औषध कंपन्यांनी विषारी औषध विकले, त्यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला निवडणुकीत फंड दिला. त्यामुळे त्यांना कारवाईपासून संरक्षण मिळत आहे. या औषध कंपन्यांनी इलेक्ट्रोरल बॉन्डच्या माध्यमातून एकूण ९४५ कोटी रुपये भाजपला देणगी दिली, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
मुलांची जावी घेणा-या
कंपन्यांवर कारवाई करा
ज्या कंपन्यांकडून भाजपला निवडणुकीत फंड मिळाला, त्यातील ३५ कंपन्या औषधांच्या गुणवत्तेच्या मानकांमध्ये पात्र नाहीत. या माध्यमातून लोकांचा जीव आणि सुरक्षेशी खेळले जात आहे. सत्तेचे संरक्षण मिळाल्याने कुणीही या घटनेची जबाबदारी घ्यायला तयार नाही. मुलांचा जीव घेणा-या दोषी कंपन्यांवर आणि त्या विक्री करणा-या अधिका-यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली.

