लातूर : प्रतिनिधी
नागरिक हक्क संघर्ष समिती आणि एसटी प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची भेट घेतली. यावेळी विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ यांच्या समक्ष औसा, तुळजापूर, सोलापूर, कोल्हापूर, उमरगा या मार्गावरील ११६ बस फे-या तसेच मुरुड, धाराशिव सर्व शटल बस फे-या पूर्ववत मध्यवर्ती बस स्थानक क्र. १ येथून सुरू करण्याचा सर्वसमावेशक तोडगा पोलीस अधीक्षकांनी सुचवला व त्याप्रमाणे बस सेवा सुरू करण्याचे विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ यांना आदेशीत केले. तसेच इतर मागण्यांबाबत चर्चा करून पुढील काळात निर्णय घेऊ असे संघर्ष समितीला अश्वस्त केले. त्यामुळे संघर्ष समितीने आंदोलन स्थगित केले.
मध्यवर्ती बस स्थानकातून पूर्ववत बस सेवा सुरू करावी या मागणीसाठी नागरिक हक्क संघर्ष समिती आणि एसटी प्रवासी संघटना सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत होती. एवढेच नाही तर आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत पूर्ववत बस सेवा सुरू करावी, असा निर्णय झाला व तशी शिफारस रस्ता सुरक्षा समिती यांच्याकडे करण्यात आली. परंतु लवकर आदेश होत नाहीत म्हणून खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना प्रवाशांच्या गैरसोयीबाबत अवगत केले. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव, विभागीय वाहतूक अधिकारी संदीप पडवळ, नियंत्रक बिरादार, तसेच संघर्ष समितीचे अॅड. उदय गवारे, अशोक गोविंदपुरकर, बसवंत भरडे, शिवलिंग चौधरी, लक्ष्मीकांत तवले, हणमंतराव पाटील, लाला सुरवसे, नवनाथ आल्टे, उत्कर्ष होळीकर, हाबीबखा पठाण आदी उपस्थित होते.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या दुरुस्तीसाठी मध्यवर्ती बसस्थानकातील ९० टक्के बस सेवा अंबाजोगाई रोडवरील बसस्थानक क्रमांक २ येथून सुरु करण्यात आली. त्यानंतर मध्यवर्ती बसस्थानक पूर्ववत सुरु झाले असले तरी लांब पल्ल्याच्या बसेस मध्यवर्ती बसस्थानकापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बसस्थानक क्रमांक २ येथूनच सोडण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. नागरिक हक्क संघर्ष समिती आणि एसटी प्रवासी संघटनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे औसा आणि मुरुड, धाराशिव सर्व शटल बस फे-या पूर्ववत मध्यवर्ती बस स्थानक क्र. १ येथून सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दुर होणार आहे.