लातूर : प्रतिनिधी
पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली असून, औसा तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी संभाजी सेनेच्यावतीने औसा तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. संभाजी सेनेने मुख्यमंत्री यांना तहसीलदारांमार्फत दिलेल्या निवेदनात शेतक-यांना प्रति एकर १ लाख रुपये तातडीची आर्थिक मदत, शेतमजुरांना रोजगार हमी योजनेंतर्गत काम, तसेच प्रत्येक कुटुंबाला दररोज १ हजार लिटर पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. याशिवाय कर्जमाफी योजनेतील पात्र शेतक-यांना केवासी व इतर जाचक अटींमध्ये न अडकवता तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नमूद करत रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
शासन व प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करत संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदाराच्या गेट समोरच ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, औसा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली असून, पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान होत आहे. मराठवाड्यातील अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे अलीकडील अहवालांतही नमूद करण्यात आले आहे.
संभाजी सेनेच्या या मागण्यांवर शासन व प्रशासन काय निर्णय घेते, याकडे औसा तालुक्यातील शेतक-यांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनात संभाजी सेनेचे अध्यक्ष सुधाकर माने, धर्मराज पवार, राजाभाऊ साळुंके, योगेश देशमुख, मदन पाटील, मोहन माळी, गणेश तिडके, प्रसाद पवार, अमोल कांदे, सुरज चव्हाण, मनोज गरड, विठ्ठल कांबळे, दगडु दळवे, आकाश पाटील, रुपेश शंके, बालाजी जाधव, आदिनाथ गोमदे, शशिकांत माने, संतोष शिंदे, किरण मुक्तापुरे आदी मोठया संख्येने शेतकरी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
















