औसा : प्रतिनिधी
औसा ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर टाका पाटी येथे सोमवारी सकाळी झालेल्या बस – दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर सदरील बस चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या रोहित्रावर धडकण्याची घटना टळली त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सदरील ठिकाणी सातत्याने अपघात घटना घडत आहेत ज्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
औसा – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी ८ वाजता सोलापूर – देगलूर (एम एच २० बीएल ३८५४) ही बसने देगलूरच्या दिशेने जात असताना शेतीमधील औजारे पाहण्यासाठी दुचाकीवरुन टाका गावाकडे जाणा-या दुचाकीवर (एम एच २४-एएल ३६६२) ला धडक दिली. या अपघातात प्रकाश निवृत्ती पवार (वय ५४ रा माळुंब्रा ता.औसा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अभिमन्यू कांबळे (वय ६० रा बेलकुंड) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळाचा पंचनामा भादा पोलिसांनी केला असून मयत प्रकाश पवार यांचे बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

