औसा : प्रतिनिधी
आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने औसा बाजार समितीच्या निवडणुकीत एकहाती विजय मिळवला. सभापती चंद्रशेखर सोनवणे व उपसभापतीपदी प्रा भिमाशंकर राचट्टे यांची नियुक्ती करण्यात आली. २२ मे, २०२३ रोजी नव्या संचालक मंडळाने कारभार हाती घेतल्यापासून बाजार समितीचा कायापालट व्हायला सुरुवात झाली. समितीचा नफा वाढला असल्याची माहिती सभापती चंद्रशेखर सोनवणे व उपसभापती प्रा .भिमाशंकर राचट्टे यांनी दैनिक एकमतशी बोलताना दिली आहे .
२०२१-२२ मध्ये बाजार समितीचे उत्पन्न २ कोटी ४६ लाख इतके होते. आ अभिमन्यू पवार यांच्या हाती बाजार समितीचे नेतृत्व आल्यानंतर त्यांनी ऊस किल्लारी कारखान्यास तर शेतमाल औसा बाजार समितीला द्या, असे आवाहन केल्याने बाजार समितीतील आवक वाढली. आवक वाढल्याने आडत्यांची संख्याही १२ ने वाढली. आ पवार यांनी आपले वजन वापरून ४ नव्या मोठ्या सोयाबीन मिलला औसा बाजार समितीतून खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले. वाढलेली आवक, नव्याने जोडलेले आडते आणि खरेदीदार याचा एकत्रित परिणाम होऊन २०२१-२२ च्या तुलनेत बाजार समितीच्या उत्पन्नात ७० टक्क्यांनी वाढ झाली. औसा बाजार समितीचे एकीकडे उत्पन्न वाढले असताना दुसरीकडे खर्च मात्र घटला आहे. त्यामुळे २०२१-२२ साली १ कोटी ३७ लाख रु. नफा झालेल्या औसा बाजार समितीला २०२३ -२४ मध्ये ३ कोटी २२ लाख रुपये इतका नफा झाला आहे. आ पवारांच्या हातात बाजार समितीचे नेतृत्व गेल्यानंतर बाजार समितीच्या ठेवींमध्ये वर्षभरातच ३ कोटींची वृद्धी झाली आहे.
आ अभिमन्यू पवार यांनी बाजार समितीला २ कोटी २५ लाख रुपयांचा विकासनिधी दिला आहे. बाजार समिती स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत इतका निधी बाजार समितीला मिळाला नव्हता केदारनाथ मंगल कार्यालयापासून बाजार समितीकडे जाणा-या १ कोटीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले समितीअंतर्गत १ कोटीच्या सी शेप रस्त्याचे तसेच २५ लाख रुपयांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे काम अंतिम टप्यात आहे. आ अभिमन्यू पवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १०१ हमालांना मोफत १ लाख रुपयाचे अपघात विमा कवच देण्यात आले. बंद पडलेला पाणी प्लांट पुनर्जीवित करण्यात आला आहे. लंपी साथीत शेतक-यांंकडील जनावरांसाठी मोफत लसीकरण शिबीर व वृक्षलागवड आदी उपक्रम राबवले.
औसा बाजार समितीतील सीसीटीव्ही कॅमे-यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. आ अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती प्रा भिमाशंकर राचट्टे, संचालक प्रवीण कोपरकर, संदिपान लंगर, युवराज बिराजदार, प्रकाश काकडे, अजित धुमाळ, संतोषी अशोक वीर, राधाकृष्ण जाधव, रमाकांत वळके, गोंिवद भोसले, ईश्वर कुलकर्णी, मोहन कावळे, विकास नरहरे, सुरेश औटी, धनराज जाधव, चंद्रकला पुरुषोत्तम झिरमिरे, शंकर पुंड यांच्याकडून बाजार समितीच्या विकासासाठी यशस्वी प्रयत्न होत आहेत. आ पवारांचे दूरदृष्टी नेतृत्व, सभापतींचे सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचे धोरण, उपसभापतींची शिस्तबद्ध कार्यपद्धती, सर्व संचालकांमधील एकोपा, व्यापा-यांचे भक्कम पाठबळ, हमालांची व इतर कर्मचा-यांची मेहनत या बाबींमुळे बाजार समितीची भरभराट होत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव संतोष हुच्चे यांनी दिली.