लातूर : आम्ही पोलीस आहोत, चार दिवस अंगावर सोन्याचे दागिने घालून फिरण्यास मनाई आहे. म्हणून दोघा तोतयांनी पोलीस असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून एका दांपत्याकडून सोन्याचे दागिने लुटल्याची घटना दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी औसा रोडवर घडली.
पंचाक्षरी बाबय्या स्वामी वय ६६ वर्षे रा. शिवनगर लातूर व त्यांच्या पत्नीस औसा रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप, गंधर्व हॉटेल येथे दोन भामट्यांनी अडवले. त्यांनी आम्ही पोलीस आहोत म्हणून बनावट ओळखपत्र दाखवले. या दांपत्यांकडील सोन्याचे मणी असलेली रुद्राक्षाची माळ व महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण असे एकुण ६७ ग्रॅम वजनाचे, ३.४० लाख रुपयांचे दागिने भर दुपारी लुटले. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दोघा तोतयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

