कर्नाटक सरकारप्रमाणे राज्य सरकारने कायदा करावा
लातूर : प्रतिनिधी
राज्यात दुष्काळाचे संकट गंभीर होत असताना शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहिनांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला. कर्नाटक सरकारने कठोर कायदा करून खासगी फायनान्स कंपन्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा करून खासगी फायनान्स कंपन्यांवर अंकुश ठेवावा, शेतक-यांना सरसकट कर्जमुक्ती, नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहन अनुदान, हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत आणि खासगी फायनान्स कंपन्यांना कठोर कायद्याने लगाम घाला, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात असताना आगामी कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित ३५ ते ३८ हजार कोटी रुपयांचा निधी दुष्काळ निवारणासाठी वापरण्यात यावा, अशी मागणी तुपकर यांनी केली. सरकारने शेतक-यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, असेही ते म्हणाले. कर्जमाफीच्या प्रक्रियेत असलेल्या जाचक अटींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप करत तुपकर म्हणाले की, कर्जमाफीच्या नावाखाली शेतक-यांची दिशाभूल होता कामा नये. कर्जमाफीचा लाभ मिळताना शेतक-यांचा सिबिल स्कोअर खराब होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी. नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांनाही २ लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान द्यावे आणि पीककर्जाची मुदत वाढवावी. सोयाबीनसह खरीप पिकांच्या उत्पादनासाठी मोठा खर्च होत असताना सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत अपुरी असल्याचे तुपकर यांनी सांगितले. दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल, कोअर कमिटीचे सदस्य राजेंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, श्रीराम चालवाड, व्यंकटराव पाटील, बालाजी शिंदे, अमर इंगळे, अमर हैबतपुरे, गौतम कांबळे, निर्मला राठोड, शरद शेट्टे, दत्ता किनीकर, नवनाथ शिंदे आदी पदाधिकारी हजर होते.
५ हजार रुपयांची
मदत अत्यंत अपुरी
जाहीर करण्यात आलेली ५ हजार रुपयांची मदत शेतक-यांच्या गरजांच्या तुलनेत अत्यंत अपुरी असल्याचे त्यांनी नमूद केले. दुष्काळाच्या परिस्थितीत जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चारा छावण्या सुरू करण्याऐवजी शेतक-यांना थेट चारा उपलब्ध करून द्यावा किंवा जनावरांच्या संख्येनुसार चा-यासाठी आर्थिक मदत द्यावी. दुष्काळाची पूर्वकल्पना असतानाही सरकारने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
मागण्या मान्य न झाल्यास
नोव्हेंबरपासून आंदोलन
शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहिनांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत. केवळ घोषणा करून शेतक-यांचे प्रश्न सुटणार नाहीत तर प्रत्यक्ष आर्थिक मदत आणि दिलासा मिळणे आवश्यक आहे. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास नोव्हेंबरपासून राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा रविकांतभाऊ तुपकर यांनी दिला.
















