चाकूर : प्रतिनिधी
शाळा भरते, सुटते, मुलं येतात-जातात हे नेहमीचंच चित्र. त्यामुळे गावक-यांचं शाळेकडे फारसं लक्ष नव्हतं. गोरगरीबांची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकत होती, तर सधन कुटुंबातील मुलं बाहेरगावी शिक्षण घेत होती. मात्र गेल्या चार-पाच महिन्यांत येथील शिक्षण प्रवाहाची दिशा बदलली आणि गावात शिक्षणाचे नवे वारे वाहू लागले. तालुक्यातील कबनसांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने अल्पावधीतच मोठी झेप घेतली आहे. शाळेचा पट व गुणवत्ता वाढीसाठीचा संकल्प केला. त्या दिशेने वाटचाल सुरू झाली. रविवार असो की सुट्टी, शाळेत रंगरंगोटी सजावट ही कामे सुरू ठेवली. शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमात सहभागही घेतला.
शैक्षणिक वर्ष संपले, उन्हाळी सुट्टी सुरू झाली. कबनसांगवी गावची शाळा मात्र सुट्टीतही भरु लागली. शाळेत तब्बल १०० विद्यार्थ्यांची उपस्थिती. मुले सुट्टीतही आनंदाने शाळेत येऊ लागली. हा सकारात्मक बदल घडवून आणला तो आयडॉल आदर्श शिक्षक प्रमोद हुडगे आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या टीमने. ऑक्टोबर २०२४ मध्ये बदलीनंतर प्रमोद हुडगे शाळेत रुजू झाले. त्यावेळी शाळेच्या ओसाड भिंती, निरुत्साही विद्यार्थी आणि उजाड अंगण अशा वातावरणाने त्यांचे स्वागत केले. मात्र त्यांनी परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. दररोज शाळा भरण्यापूर्वी एक तास व शाळा सुटल्यानंतर एक तास असे काम सुरू झाले. लोकसहभागातून व स्वखर्चाने शाळेच्या भिंती बोलक्या केल्या. सकाळी सात ते सायंकाळी सहा असे वेळापत्रक आखून त्यांनी विद्यार्थ्यांना भरपूर वेळ दिला. शासनाच्या इतर जबाबदा-या सांभाळत त्यांनी शिक्षणाची गाडी रुळावर आणली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निळकंठ निला, पोलिस पाटील सोपान पाटील, सरपंच अनुश्री सांगवे, उपसरपंच मिनाक्षी राजारुपे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव नागराळे, आणि सोसायटीचे चेअरमन संजय पाटील यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
















