16.9 C
Latur
Sunday, November 9, 2025
Homeमहाराष्ट्र कबुतरांना दाणे; मुंबईत पहिला गुन्हा दाखल

 कबुतरांना दाणे; मुंबईत पहिला गुन्हा दाखल

  मुंबई : कबुतरखान्यांचा तिढा काही सुटण्यास तयार नाही. असे असताना कबुतरांना दाणे टाकण्याचे उद्योग सुरूच आहेत. माहीममधील एल. जे. मार्ग डॉमिनिक पिझ्झाजवळ कबुतरांना खाद्य टाकल्याबद्दल अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविला असून, मुंबईत या प्रकरणातील पहिलीच कारवाई आहे.
 नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचत असल्यामुळे कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारने मुंबई महापालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने कबुतरखाने बंद करण्यासाठी हालचाली सुरू करून दादरच्या कबुतरखान्यातील बांधकाम काढून टाकले. तसेच तेथून जवळपास ५० किलो धान्य जप्त करण्यात आले होते. दादरप्रमाणेच मुंबईतील अन्य कबुतरखान्यांवरही कारवाई करण्यास सुरुवात झाली होती.
फोर्ट परिसरातील जीपीओ भागातील कबुतरखान्याच्या ठिकाणी कारंजे उभारण्याचा पर्याय पालिकेपुढे होता; परंतु कबुतरखान्याच्या बांधकामावर कार्यभाव करू नये, असे निर्देश दिल्यामुळे कारवाई थंडावली. मात्र, त्याच वेळेस कबुतरांना खाद्य देणा-यांवर कारवाई करा, असे निर्देशही न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिकेने कारवाई सुरू केली आहे.
 अनेक ठिकाणी अजूनही लोक कबुतरांना खाद्य देत असल्याचे आढळून आले आहे. खाद्य टाकणा-यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्यामुळे पालिकेच्या कारवाईला बळ मिळणार आहे.
 गुन्हे दाखल होऊ लागले तरच कबुतरांना खाद्य टाकणे बंद होईल, अशी पालिकेला अपेक्षा आहे. दुसरीकडे दादरमधील कबुतरखान्यावर जाळी बसविण्यास मुंबई महापालिकेच्या कर्मचा-यांना स्थानिकांनी मज्जाव केला. त्यामुळे कबुतरखान्यांचा तिढा सोडवायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR