बुलडाणा : शहरातील एका मुस्लिम कब्रस्तानमध्ये दोन तरुणांनी कबरींची थट्टा केल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हीडीओमध्ये दोन तरुण हे कबरींवर लिहिलेली नावे वाचताना आणि त्यांची थट्टा करताना दिसले. यामुळे संतापाचे वातावरण असून अनेक लोक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात जमले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
बुलडाणा येथे धार्मिक भावना दुखावल्याचा एक प्रकार समोर आला आहे. मलकापूर रोडवरील मुस्लिम कब्रस्तानमध्ये शूट करण्यात आलेला एक व्हीडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आणि परिसरात तणाव निर्माण झाला. या व्हीडीओमध्ये, दोन तरुण दिसत असून ते कबरींमधून फिरताना, सेल्फी काढताना आणि कबरींवरील नावे वाचत, त्यावरून विनोद करताना दिसले. एवढेच नव्हे तर शेवटी त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली असाही आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हीडीओ १९ वर्षीय अनुज रिसोडकर आणि ओम फाटे यांनी तयार केला आहे. त्यांनी तो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला.
‘कब्रिस्तान फनी व्हीडीओ’अशा कॅप्शनसह त्यांनी तो पोस्ट केला होता. पाहता पाहता हा व्हीडीओ वा-याच्या वेगाने पसरला आणि प्रचंड व्हायरल झाला. आणि याची माहिती मुस्लिम समुदायातील लोकांपर्यंतही पोहोचली. मात्र या व्हीडीओबद्दल समाजात तीव्र संताप दिसून आला. संवेदनशील परिस्थिती ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. हा व्हीडीओ बनवणा-या दोन्ही तरुणांची ओळख पटवून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

