मुंबई : प्रतिनिधी
दहावीच्या परीक्षेचा निकाल ८ मे रोजी लागला. याही वर्षी मुलींनीच बाजी मारली. पण काही विद्यार्थ्यांना परिक्षा म्हटलं की, टेन्शन येतंच. पण यामुळे आत्महत्या हे खूप मोठं आणि चुकीचं पाऊल अनेक विद्यार्थी उचलत आहेत.
दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल लागण्याच्या तासभर आधी म्हणजे ८ मे २०२६ रोजी सकाळी संभाजीनगरमधील एका विद्यार्थ्याने गळफास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, नापास होण्याच्या भीतीने सोहम ज्ञानेश्वर मोरे या विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दहावीच्या निकालानंतर आनंदाचं वातावरण असतानाच धाराशिवमधून एक हृदयद्रावक घटना घडली. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं. धाराशिव जिल्ह्यातल्या भूम येथे राहणा-या आदित्य नितीन जाधव या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. आदित्य हा भूममधील रवींद्र हायस्कूल येथे दहावीत शिक्षण घेत होता. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात त्याला ६३.६० टक्के गुण मिळाले होते. पण ते त्याच्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने त्याने राहत्या घरी साडीच्या मदतीने गळफास घेत आत्महत्या केली.
नागपुरातील विद्यार्थिनीची आत्महत्या
दहावीच्या निकालानंतर नागपूरही हादरले. एका विद्यार्थिनीने घरात गळफास घेतला. या सगळ्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आणि मित्रपरिवार आणि शाळेतही शोककळा पसरली आहे. दहावी-बारावीचे रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव वाढत असल्याचे चित्र अनेकदा समोर येते. गुण कमी मिळाले म्हणजे आयुष्य संपत नाही, हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे. मानसिक तणावाच्या काळात मुलांशी संवाद ठेवणे आणि त्यांना भावनिक आधार देणे तितकेच महत्त्वाचे मानले जाते.
















