बसचे नुकसान, १७ प्रवासी जखमी
लातूर : प्रतिनिधी
कराडहून लातूरकडे येणारी एसटी बस बुधवारी रात्री ८ च्या सुमारास लातूरजवळ रामेगाव पाटी येथे उलटली. यात एसटी बसमधील ७० प्रवाशांपैकी १७ जण जखमी झाले. खोदलेल्या साईडपट्टयांमुळे हा बस अपघात झाला. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसमधील ५३ प्रवासी सुखरूप आहेत. तथापि, बसगाडीचे मोठे नुकसान झाले.
सध्या लातूर-बार्शी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यातच खोदकामाचा अंदाज येत नसल्याने अपघात वाढले आहेत. कराड-लातूर धावणा-या बसचालकालाही रस्त्याचा अंदाज न आल्याने बस उलटली. मात्र, रस्त्याचे काम सुरू असल्याने बसचा वेग आधीच कमी होता. त्यामुळे बसची हानी झाली असली तरी प्रवासी सुखरूप आहेत. १७ जखमींना तातडीने लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रीच्या वेळी प्रवाशांची आरडाओरड सुरू होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. त्यातच रुग्णवाहिका वेळेत आल्याने तातडीने जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले.