अमेरिकेसोबतच्या व्यापारी करारावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापार धोरणात कापूस आणि गारमेंट्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासह कॅबिनेटवर जोरदार हल्ला चढवला आहे. अमेरिकेसोबत झालेला व्यापार करार हा कापूस उत्पादक शेतकरी आणि गारमेंट्स उद्योगाला ‘धोका’ देणारा करार केल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर भ्रम पसरवत असल्याचा हल्लाबोल केला.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये बांगलादेशला अमेरिकेत गारमेंट्स निर्यातीवर ० टक्के टॅरिफचा फायदा दिला जात आहे. मात्र, त्यासाठी बांगलादेशने अमेरिकन कापूस आयात करावा, अशी अट घातली आहे. याउलट भारताच्या गारमेंट्सवर १८ टक्के टॅरिफ लागू करण्यात आला आहे. संसदेत या मुद्यावर प्रश्न उपस्थित केल्यावर सरकारच्या मंत्र्यांनी दिलेले उत्तर राहुल गांधी यांनी उघड केले. मंत्र्याचे म्हणणे होते की, जर हाच फायदा भारताला हवा असेल तर अमेरिकेकडून कापूस आयात करावी लागेल. यावर राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित करत ही बाब देशापासून आतापर्यंत लपवून का ठेवली गेली, असे म्हटले.
…तर भारतीय कापूस
उत्पादकांना फटका
राहुल गांधी यांनी या परिस्थितीला पुढे आड आणि मागे विहीर अशी उपमा दिली. जर भारताने अमेरिकन कापूस आयात करण्याचा पर्याय स्वीकारला तर देशातील कापूस शेतक-यांचे नुकसान होईल आणि हा पर्याय नाकारला तर भारतीय टेक्सटाइल उद्योग १८ टक्के टॅरिफच्या ओझ्याखाली दबला जाणार आहे. याशिवाय, बांग्लादेश भारताकडून कापूस आयात कमी किंवा बंद करण्याचे संकेत देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे दुहेरी संकट ओढवणार आहे.
अमेरिकेच्या दबावापुढे
मोदी सरेंडर : राहुल गांधी
राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर थेट निशाणा साधत नरेंद्र ‘सरेंडर’ मोदी असा टोला लगावला. त्यांच्या म्हणण्यानुसार हा करार राष्ट्रीय हिताचा नसून दबावाखाली केलेला निर्णय वाटतो, जो देशाच्या आर्थिक कणा असलेल्या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांना धोक्यात टाकणारा ठरू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

