पुणे : निवडणूक आयोगाने राज्यात नगरपंचायत, नगरपालिका निवडणुका जाहीर केल्या असून, सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. करुणा मुंडे यांनी काढलेल्या स्वराज्य शक्ती सेना पक्षानेदेखील निवडणुकीची तयारी केली असून, पुणे जिल्ह्यातील एकूण १४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पक्षाच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी १० नोव्हेंबर सोमवारी केली.
एकाच घरातील लोक वेगवेगळ्या पक्षात पाहायला मिळतात : पुण्यातील पत्रकार भवन येथे स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांची आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी करुणा मुंडे म्हणाल्या की, राज्यात आपण पाहिलं तर एकाच घरातील लोक हे आपल्याला वेगवेगळ्या पक्षात पाहायला मिळत आहेत.
बायको भाजपाची आमदार आहे, तर नवरा राष्ट्रवादीमध्ये आहे. आपले सगळे प्रश्न आहे त्याच ठिकाणी आहेत. सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे कोणीच पाहत नाही. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांच्या संदर्भात आम्ही काढलेल्या स्वराज्य शक्ती सेना हा पक्ष आता जिल्ह्यात होणा-या नगरपंचायत तसेच नगरपालिका निवडणुका या स्वबळावर लढणार आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादेखील आम्ही लढवणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

