यवतमाळ : प्रतिनिधी
राज्य सरकारने नुकताच कर्जमाफी झालेल्या शेतक-यांची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर होताच शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बँकेमध्ये रांगा लावून शेतकरी आपली कर्जमाफी झाली की नाही हे तपासत आहेत. अशामध्येच यवतमाळमधून एक मन सुन्न करणारी घटना घडली. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव न आल्याने शेतक-याने आत्महत्या केली. राळेगाव तालुक्यातील भांब गावात ही हृदयद्रावक घटना घडली.
राजू बापूराव चुड्डुके (४९ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव होते. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील भांब गावामध्ये ते कुटुंबीयांसोबत राहत होते. हा शेतकरी बँकेमध्ये कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आले की नाही हे तपासण्यासाठी गेला होता. पण त्याला यादीमध्ये आपले नाव दिसले नाही. त्यामुळे ते नैराश्येत गेले. बँकेतून घरी आल्यानंतर त्यांनी विष प्राशन करून आयुष्य संपविले.
राजू चुड्डूके या शेतक-यांच्या कटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या नावाचा कर्जमाफीच्या यादीत समावेश न झाल्याने ते मानसिक तणावाखाली आले होते. त्यांच्या नावावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तसेच चार मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज असल्याचे बोलल्या जात आहे. त्यांच्या नावावर मुधापूर उजाड येथे १ हेक्टर ३९ आर शेती आहे.
राजू चुड्डूके यांनी रात्री १० वाजता विष प्राशन केल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ राळेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजू यांच्या पाश्चात पत्नी आणि दोन लहान मुलं असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कर्जबाजारी शेतक-यांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. या घटनेची नोंद करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.















