लातूर : प्रतिनिधी
आखातातील युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्याने महाराष्ट्रात कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून, दरात मोठी घसरण झाली आहे. लातूर जिल्ह्यात कलिंगड शेतात पडून असल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, फळ बाजारात दि. १ एप्रिल रोजी ३०० टन कलिंगडाची आवक झाली. त्यामुळे फळ मार्केट कलिंगड ५ रुपये तर किरकोळ बाजारात १० रुपये किलोने विकले जात असून, कलिंगडाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेती कलिंगडाची; मरण शेतक-यांचे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आखाती देशांतील युद्धाचा परिणाम म्हणून भारतीय कलिंगड निर्यात ठप्प झाली आहे. निर्यात बंद झाल्यामुळे स्थानिक बाजारात कलिंगडाचे दर खूपच कमी झाले आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये कलिंगडाची मोठी लागवड असूनही, व्यापारी माल खरेदी करत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. असे असले तरी लातूर जिल्ह्यासह सीमा भागातील कर्नाटक, आंध्र्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यातूनही कलिंगडाची मोठी आवक लातूरच्या फळ बाजारात होत आहे. फळ मार्केट कलिंगड ५ रुपये किलो तर किरकोळ विक्री १० रुपये किलो या दराने होत आहे. काही ठिकाणी ५० रुपयांना ३ तर १०० रुपयांना ५ कलिंगड विकले जात आहेत.
लातूरच्या फळ मार्केटमध्ये बुधवारी ३०० टनांहून अधिक कलिंगडाची आवक झाली होती. लातूर शहरात कलिंगडाची होणारी थेट आवकही मोठी आहे. शेतक-यांच्या बांधावर व्यापारी कलिंगडाचे एक नग एक रुपयाला मागत आहेत. त्यामुळे स्वत: कलिंगड उत्पादक शेतकरीच वाहन करुन कलिंगड शहरात आणुन विकत आहेत. शहरातील बा वळण महामार्ग, दयानंद गेट, गंज गोलाईचा पुर्व भाग, विवेकानंद चौक आदी ठिकाणी शेतकरी स्वत: कलिंगड विकत आहेत.

