लातूर : प्रतिनिधी
तरुणांनी कॉलेज जीवनात शिक्षणासोबतच वेळेचे आणि संधीचे भान ठेवणे आवश्यक आहे. गेलेली वेळ आणि संधी पुन्हा येत नाही, त्यामुळे मिळालेल्या संधीचे सोने करा. विशेषत: कलेच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर यश मिळवूनही तुमचे पाय जमिनीवर असायला हवेत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रूपलक्ष्मी शिंदे यांनी केले.
शिव छत्रपती शिक्षण संस्थेच्या येथील राजर्षी शाहू महाविद्यालयच्या स्नेहसंमेलन ‘शांतिपर्व २०२६’ च्या उद्घाटन प्रसंगी अभिनेत्री रुपलक्षमी शिंदे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील होते. यावेळी शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अजय जाधव, सहसचिव उद्धव पाटील, सदस्य प्रकाश देशमुख, अमर देशमुख, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य प्रा सदाशिव शिंदे, पर्यवेक्षक डॉ. भीमराव पाटील, विद्यार्थी परिषदेचे प्रभारी प्रा. डॉ. संभाजी पाटील, विद्यार्थी परिषदेचा सचिव फरदीन शेख व सर्व विभागांच्या प्रभारी प्राध्यापकांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना रूपलक्ष्मी शिंदे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालय स्नेहसंमेलन आणि युवक महोत्सवासारखी व्यासपीठे उपलब्ध करून देते. या संधीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी आपली कला जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात ‘जीव झाला वेडा पिसा’ , ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’; या मालिकांमधील आणि ‘सरगम’; चित्रपटातील आपल्या प्रवासाचे दाखले देत कला जीवनाला आकार व आनंद देते, असे
सांगितले. प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी महाविद्यालयाचे यशोगाथा ओघवत्या शैलीत सांगितली\ सूत्रसंचालन डॉ. अनुजा जाधव व डॉ. सुदर्शन पाटील यांनी केले. तर सर्वांचे आभार संसदेचे प्रभारी प्राध्यापक डॉ. संभाजी पाटील यांनी मानले. या उद्घाटन सोहळ्याने ‘शांतिपर्व २०२६’ची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली असून, विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे दर्शन या निमित्ताने घडणार आहे.
…………………

