६ जण जखमी, मृतांमध्ये ३ बालकांचा समावेश
ठाणे : प्रतिनिधी
कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा भागात मंगळवारी दुपारी श्री सप्तशृंगी या धोकादायक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील पृष्ठभागाचा स्लॅब तळ मजल्यावर कोसळला. त्यानंतर तिस-या, दुस-या आणि पहिल्या माळ््यावरील स्लॅबही कोसळत गेला. या भीषण दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ३ महिला आणि ३ बालकांचा समावेश आहे. चार जखमींवर पालिका आणि खाजगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
कल्याण पूर्व मंगलराघोनगर परिसरातील श्री सप्तशृंगी या इमारतीत ही धक्कादायक घटना घडली. या ४ मजली इमारतीतील चौथ्या मजल्यावर डागडुजीचे काम सुरू होते. त्यावेळी त्याचा स्लॅब कोसळला. तो थेट तळमजल्यापर्यंत कोसळला. त्यामुळे या ढिगा-याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यानंतर तातडीने मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले. इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर त्या ठिकाणी अग्निशमन दल, महापालिकेचे पथक पोहोचले.
सुरुवातीला या ढिगा-याखालून ८ जणांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ३ महिला आणि दीड वर्षाच्या चिमुकलीसह ३ बालकांचा समावेश आहे. इतर दोघांसह ४ जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिकणीपाडा येथील श्री सप्तशृंगी इमारतीचे बांधकाम २००६ मध्ये करण्यात आले. ही इमारत चार मजल्याची आहे. ही इमारत गेल्या वर्षी पालिकेच्या जे प्रभागाने धोकादायक घोषित केली होती. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एका कुटुंबीयाकडून घरातील देखभाल, दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.