नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कप २०२४ नंतर राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार असल्याने राजीनामा देणार आहे. भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याचा कार्यकाळ आगामी विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला होता. सोमवारी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. दरम्यान, द्रविडला कसोटी संघाचे प्रशिक्षक राहण्याचा सल्ला देण्यात आल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. मात्र, द्रविडने नकार दिला.
एका स्पोर्टस् मॅग्झिनने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंनी राहुल द्रविडला कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदावर कायम राहण्याची विनंती केली होती. मात्र, राहुल द्रविडने त्यास नकार दिला आहे. अलीकडेच बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले होते की, वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा प्रशिक्षक असणार नाही. अशा परिस्थितीत तिन्ही फॉरमॅटसाठी एकाच प्रशिक्षकाचा शोध बीसीसीआय घेत आहे. मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ ३.५ वर्षांसाठी असणार आहे. टी-२० विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपत आहे. दरम्यान, मुख्य प्रशिक्षकपदावर कायम राहण्यासाठी त्यालाही अर्ज करावा लागणार आहे. बीसीसीआयने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे ठेवली आहे.
फ्लेमिंग यांनी प्रशिक्षक व्हावे, अशी बीसीसीआयची इच्छा आहे
दरम्यान, व्हीव्हीएस लक्ष्मण, गौतम गंभीर आणि जस्टिन लँगरसारखे क्रिकेटपटू या पदासाठी अर्ज करू शकतात. लक्ष्मणने अर्ज केल्यास तो प्रशिक्षक पदासाठी सर्वांत मोठा दावेदार असेल. ४९ वर्षीय लक्ष्मण गेल्या तीन वर्षांपासून एनसीएचा प्रमुख आहे. भारत अ आणि अंडर-१९ संघही त्याच्या देखरेखीखाली आहे. द्रविडच्या अनुपस्थितीत त्याने भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिकाही बजावली आहे. मात्र सूत्रांच्या मते, बीसीसीआयला राहुल द्रविडच्या जागी न्यूझिलंडचे माजी खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्जचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनवायचे आहे, अशी माहिती समोर आली आहे.