Homeलातूरकाँग्रेसकडून शासनाच्या परिपत्रकाची होळी करीत जाहीर निषेध

काँग्रेसकडून शासनाच्या परिपत्रकाची होळी करीत जाहीर निषेध

लातूर : प्रतिनिधी
राज्य शासनाने २५ मे रोजी एक परिपत्रक जाहीर करत आरोग्य खात्या अंतर्गत कोणत्याही बांधकामाला यापुढे परवानगी देण्यात येणार नाही, असे आदेश निर्गमित केले. परिणामी लातूर जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचा विषय रखडला आहे. त्यामुळे लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने दि. १० जुलै रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत शासनाच्या परिपत्रकाची होळी करुन जाहीर निषेध केला आहे.
राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नुकतेच आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन अनेक दिवसांपासून लातूर जिल्हा रुग्णालयाच्या जागेबाबत कृषी विद्यापीठाला वर्ग होणा-या निधीबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानंतर शासनाने कृषी विद्यापीठाला निधी वर्ग केला व लातूरच्या जिल्हा रुग्णालयाला जागा हस्तांतर करण्यात आली. मात्र जागा हस्तांतर होऊनही जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचे काम सुरू झाले नाही. यापूर्वीच लातूर जिल्हा रुग्णालयाला बांधकामासाठी निधीही मंजूर आहे.
‘माझं लातूर’ या सामाजिक परिवारामार्फत लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न गेली अनेक वर्ष लावून धरलेला असून जागेच्या हस्तांतराचा प्रश्न संपल्यानंतर लवकरात लवकर लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न निकाली निघेल असे वाटत असतानाच शासनाच्या या परिपत्रकामुळे लातूरमध्ये शासनाच्या विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून गुरुवारी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या या परिपत्रकाची होळी करत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी लातूर यांची भेट घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.  काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात शासनाने हे परिपत्रक परत घ्यावे व लातूर जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाला लवकरात लवकर सुरुवात करावी अन्यथा काँग्रेस पक्ष शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, माजी उपमहापौर कैलास कांबळे, डॉ. बालाजी सोळुंके, सुपर्ण जगताप, इम्रान सय्यद, प्रा. प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, आसिफ बागवान, गोरोबा लोखंडे, आयुब मणियार, पप्पू देशमुख, विजय गायकवाड, दत्ता सोमवंशी, सिकंदर पटेल, गिरीश ब्याळे, सुंदर पाटील कव्हेकर, बालाजी गवळी, अ‍ॅड. गणेश कांबळे, तबरेज तांबोळी, हमीद बागवान, प्रा. संजय ओहोळ, जी. ए. गायकवाड, सत्यवान कांबळे, राजकुमार कत्ते, विजय टाकेकर, पिराजी साठे, पवन बनसोडे, असलम शेख, अबू मणियार, सुरज राजे यांच्यासह लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनेक पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR