नाशिक : प्रतिनिधी
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा आता अवघ्या १० महिन्यांवर येऊन ठेपला आहे. हा कुंभमेळा सुमारे २१ महिने चालेल. यामध्ये अमृतस्रान आणि इतर धार्मिक विधी पार पडतील. यावेळी लाखो साधू-संत आणि तितकेच भाविक भक्त येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पायाभूत सोयी-सुविधा उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पण तपोवन येथे साधुग्राम उभारण्यासाठी १,८०० झाडे तोडण्यात येणार असल्याची माहिती वा-यासारखी पसरली आणि मग त्याविरोधात मोठं आंदोलन उभं ठाकलं.
या वृक्षतोडीला स्थानिकांनी आणि विविध पक्षांनी विरोध सुरू केला आहे. या मुद्यावरून काँग्रेसने राज्यातील प्रमुखावर जिव्हारी टीका केली आहे. ‘झाडंखाऊ’ असे लिहून एका व्यंगचित्राद्वारे काँग्रेसने संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. काँग्रेसने फेसबुकवर याविषयीची पोस्ट लिहिली आहे. त्याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे.
राष्ट्रीय काँग्रेसने हे व्यंगचित्र त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये सगळीकडं बेसुमार वृक्षतोड दाखवण्यात आली आहे. या चित्रात झाडं तोडल्यानंतर त्यांचे बुंधे तेवढे उरलेले दिसतात. तर एका मोठ्या व्यक्तीच्या हातात कु-हाड दाखवली आहे. या व्यक्तीचा चेहरा काँग्रेसने दाखवलेला नाही. या चित्राच्या वरील भागात ‘झाडखाऊ’ असे लिहिण्यात आले आहे. या व्यंगचित्रातून नाशिकमधील वृक्षतोडीवर संताप व्यक्त करण्यात आल्याचं समोर येत आहे. काँग्रेसच्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. हे व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती
तपोवनातील झाडं तोडून होणा-या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये याविषयीची माहिती दिली. वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर साधू- महंतांसाठी भव्य डोम उभारला जाणार होता. हाच डोम पुढील ३२ वर्षांसाठी खाजगी कंपनीमार्फत एक्झिबिशन सेंटर अर्थात प्रदर्शन केंद्र म्हणून वापरला जाणार होता. बीओटी तत्त्वावर होणा-या या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता. या सगळ्या विरोधानंतर अखेर या बीओटी तत्त्वावरील प्रदर्शन सेंटर उभारणीच्या २२० कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे.

