लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते, उत्कृष्ट व्हॉलिबॉलपटू मोईज नईमोद्दीन शेख यांचे प्रदीर्घ आजाराने मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता पुणे येथे निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. त्यांचा दफनविधी लातूर शहरातील हमाल गल्ली कब्रस्तान येथे रात्री १० वाजता करण्यात आला.
विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या टीममधील आघाडीचे फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. शिक्षण, सामाजिक, राजकीय तसेच क्रीडा क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. लातूर शहराचे दोन टर्म उपनगराध्यक्ष, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष, लातूर जिल्हा पासिंग व्हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, विठ्ठल नागरी बँकेचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेचे सदस्य तसेच विविध शिक्षण संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून त्यांनी पदे भूषविली. मराठवाड्यातील अल्पसंख्याक समाजाचे अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख राहिली. लातूर शहराच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. मोईज शेख हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुणे येथील नामांकित रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, जावाई असा परिवार आहे.
पोकळी कधीही भरून न निघणारी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, लातूरचे माजी उपनगराध्यक्ष, आदरणीय मोईजभाई शेख यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी व माझा संपूर्ण परिवार सहभागी आहे. त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आदरणीय मोईजभाई शेख यांचे लातूरच्या जडणघडणीत अत्यंत मोलाचे योगदान राहिले आहे. ते उत्तम खेळाडूही होते त्यामुळे लातूर येथे खेळाडूंसाठी सोयी, सुविधा उभारण्याच्या कामी ते सतत प्रयत्नशील असत. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे ते विश्वासू सहकारी होते. काँग्रेस पक्षाच्या संघटन बांधणीत ते आयुष्यभर सक्रिय राहिले. आजवर आम्हालाही त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शक आणि सहकार्य मिळत राहिले आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत राहून त्यानी समाजातील सर्व वर्गातील जनतेशी अत्यंत जिव्हाळ्याचे वैयक्तिक संबंध निर्माण केले होते त्यामुळे या सर्वच क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशी माझी भावना आहे.
– माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख.
संघटन कौशल्य असलेले काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आपल्यातून गेल्याचे दु:ख
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, लातूर नगरीचे माजी उपाध्यक्ष व लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोईजभाई शेख यांचे निधन झाल्याचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. त्यांच्या दु:खात मी व माझा परिवार सहभागी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मोईजभाई शेख हे काँग्रेसचे एकनिष्ठ पदाधिकारी नेते होते. काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत त्यांचा वाटा होता. लातूरचे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी भरीव काम केले. शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पक्षाचे संघटन उभे केले. काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांनी अतिशय चांगल कार्य केले. पक्षीय कार्य करत असताना उत्तम खेळाडू म्हणून क्रीडा क्षेत्रात मोठे काम केले तसेच सामाजिक कार्यात विविध समाजात सक्रिय राहून सर्वांना मदत करण्याची भूमिका नेहमी घ्यायचे त्यामुळे सर्व समाजात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. लोकनेते विलासराव देशमुख, आमदार अमित देशमुख, माजी आमदार जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज देशमुख व माझ्या प्रत्येक निवडणुकीत ते प्रचारात सहभागी व्हायचे. त्यांच्या या दु:खद निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबांना ही दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही ईश्वर चरणी प्रार्थना.
– माजी मंत्री दिलीपराव देशमुख.
काँग्रेसमधील ऊर्जावान कार्यकर्ता हरपला
आदरणीय मोईज भाई शेख म्हणजे एक खिलाडू, प्रेमळ कर्तबगार, पक्षनिष्ठ, नेतृत्वाच्या शब्दाला प्रमाण मानणार आदर्श व्यक्तिमत्त्व. पक्षाचे काम करू इच्छिणा-या प्रत्येक युवकाला सहकार्य करणे, प्रोत्साहन देणे हा त्यांचा स्वभाव अक्षरश: प्रेमाचा मायेचा धबधबा, असे सर्वांचे आवडते भाई आज आपल्यात नाहीत. त्यांची पोकळी कधीही भरून निघू शकणार नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या निधनाने झालेल्या दु:खातून बाहेर निघण्याची शक्ती त्यांचा परिवार व त्यांच्यावर प्रेम करणा-या सर्वांना ईश्वर प्रदान करो हीच प्रार्थना.
लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके
एक समर्पित व्यक्तिमत्त्व हरवले
आदरणीय मोईजभाई शेख यांनी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणून विविध पदांवर आपली छाप पाडली. त्यांनी पक्षात मार्गदर्शकाची भूमिका खुप चांगल्या पद्धतीने पार पाडली. राजकीय व सामाजिक जीवनात त्यांनी दिलेले योगदान
सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनातील एक समर्पित व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांचे खुप स्नेहाचे आणि जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांच्या जाण्याचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना
– लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख.
सहका-यांच्या पाठीशी उभारणारे नेतृत्व
आदरणीय मोईजभाई शेख यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सांभाळलेली धुरा आणि संघटनात्मक कामांवर ठेवलेली मजबूत पकड आम्हा सर्वांसाठी सदैव मार्गदर्शक ठरली. पक्षाच्या प्रत्येक कठीण प्रसंगात सहका-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा नेता अशीच त्यांची ख्याती होती. त्यांचे वेळोवेळी लाभलेले बहुमोल मार्गदर्शन, स्नेह आणि सहकार्य मी कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या जाण्याने लातूरच्या सार्वजनिक व राजकीय जीवनात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आम्ही एक सच्चा मार्गदर्शक आणि ज्येष्ठ सहकारी गमावला आहे.
-विलास को-ऑप. बँकेचे चेअरमन अॅड. किरण जाधव
















