26.7 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसचे माजी मंत्री सुरूपसिंग हि-या नाईक यांचे निधन

काँग्रेसचे माजी मंत्री सुरूपसिंग हि-या नाईक यांचे निधन

नंदुरबार : काँग्रेसचे भीष्म पितामह माजी मंत्री सुरूपसिंग हि-या नाईक यांचे ८८ व्या वर्षी दु:खद निधन झाले आहे. गांधी परिवाराचा सच्चा सेवक म्हणून त्यांची ओळख होती. इंदिरा गांधींपासून तर राहुल गांधींपर्यंत नाईक कुटुंबांचे घरोब्याचे संबंध आहेत. इंदिरा गांधी यांनी सुरूपसिंग नाईक यांना आदिवासींचा सच्चा सेवक म्हणून गौरवले होते. ते काँग्रेसचे आमदार शिरीषकुमार नाईक यांचे वडील आहेत. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्या गावी नवापूर तालुक्यातील नवागाव येथे अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचा जन्म १० सप्टेंबर १९३८ रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नवागाव या लहानशा आदिवासी वस्तीत झाला. त्यांनी शिक्षण घेतले आणि नंतर आपल्या गावी १९६२ साली सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर पंचायत समितीत अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. काँग्रेस पक्षात प्रवेश करत संयुक्त असलेला धुळे-नंदुरबार काँग्रेसचे ते सदस्य झाले. तेथे केलेल्या कामामुळे ते सरचिटणीस पदापर्यंत पोहोचले. १९६२ ते १९७२ या काळात त्यांनी जे कार्य केले त्याने त्यांच्या पुढील राजकीय कारकीर्दीसाठी पायाभूत भूमिका बजावली.

१९७२ साली नवापूर विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने ते निवडून आले. मार्च १९७७ मध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे तिकिट मिळवून निवडून आले. त्यानंतर १९८० साली पुन्हा आमदारकी लढवत राज्यात कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर ते नवापूर मतदारसंघात सातत्याने निवडून आले. काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी अनेक खात्यांचे कॅबिनेट मंत्रिपद भूषवले. २००९ साली विधानसभेत डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू माजी आ. शरद गावित यांचा त्यांनी पराभव केला.

अनेक दिवसांपासून सुरूपसिंग नाईक यांची प्रकृती बरी नव्हती. २४ डिसेंबर रोजी सकाळी नवापूर शहरातील एका रुग्णालयात त्यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले. स्व. इंदिरा गांधी ते राहुल गांधींपर्यंत सर्व गांधी कुटुंबाचे नाईक परिवाराशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षात तसेच महाराष्ट्रातील राजकारणासह नंदुरबारमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR