22.2 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeलातूरकाँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपणा-यांपासून सावध राहा

काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपणा-यांपासून सावध राहा

लातूर : प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्रमांक ५ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. काँगेसला आव्हान देण्यासाठी काही लोकांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सामिल झाले आहेत. त्यांच्यापासून सावध राहा, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक ५ मधील उमेदवार मंगेश कांबळे, सुरेखा इगे, नसरीन अस्लम शेख, लक्ष्मीकांत मंठाळे यांच्या प्रचारार्थ दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी प्रभागातील तज्जमुल उस्ताद स्क्रॅप मार्केटमध्ये आयोजित विराट प्रचार सभेत माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी हाजी सलीम उस्ताद होते. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश सचिव मुफ्ती वसीम सय्यद, माजी उपमहापौर कैलास कांबळे, कल्याण पाटील, शिवाजी टमके, अ‍ॅड. बालाजी कुटवाडे, जाकेर शेख, शीलाताई पाटील, बाबुभाई शेख, व्यंकटेश पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
लातूरमध्ये काँग्रेस-वंचितचं वादळ निर्माण झालय, हे प्रभाग ५ मधील विराट सभेतून दिसून येत आहे, असे नमुद करुन माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले, प्रभाग क्रमांक ५ मध्ये काँग्रेस पक्षाने २५ कोटी रुपयांची विकास कामे केली. ही सर्व विकास कामे काँग्रेस महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली. तज्जमुल उस्ताद स्क्रॅप मार्केट आदरणिय विलासराव देशमुखसाहेबांनी उभं केलं. एखाद्याला पक्ष सोडून जायचे तर खुशाल जा. पण, एक लक्षात ठेवा, तुम्ही गेले म्हणजे काँग्रेस पक्षाने केलेली विकास कामे तर तुमच्यासोबत जात नाहीत. तुम्ही जे महापौर पद लावून फिरताय ते पद काँग्रेसचेच आहे. एवढी नाराजी असे तर महापौर पद लावू नका. इथे जर कोणी दमबाजी केली तर जशास तसे उत्तर दिले जाईल. आमच्या संयमाचा कोणी अंत पाहू नये, असा इशारा त्यांनी दिला.
मतांचे विभाजन करण्यासाठी काही लोक लातूर महापािलकेच्या निवडणुकीत उभे आहेत. आदरणिय शिवराज पाटील चाकुरकरसाहेब, आदरणिय विलासराव देशमुखसाहेब, आदरणिय दिलीपराव देशमुखसाहेब, आदरणिय सोनियाजी गांधी, राहूलजी गांधी आणि तमाम लातूरकरांचे हे लातूर आहे. येणार पाच वर्षांत कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन प्रभाग क्रमांक ५ चा सर्वांगीण विकास करु, असे नमुद करुन माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले, लातूरकरांचा जाहिरनामा आम्ही प्रकाशित केला आहे. त्यात पाच गॅरंटी दिल्या आहेत. सर्व मतदारांनी सतर्क राहावे. सत्ताधारी, विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, महायुतीच्या भानगडीत पडू नका. आपल्याला संविधानाची सुरक्षा करायची आहे. लातूरमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखायची आहे. इथे गुंडगिरी वाढणार नाही, मटका, अवैध धंदे, अमली पदार्थ, खुन-खराबे यावर आळा घालायचा आहे. हे सर्व असच होत नाही. त्यासाठी कोणीतरी काळजी व्हावी लागते. आदणिय शिवराज पाटील चाकुरकर, आदरणिय विलासराव देशमुख, आदरणिय दिलीपराव देशमुख यांनी काळजी व्हायली म्हणून लातूर सुरक्षीत आहे आणि आम्हीही तेच करत आहोत, असेही माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी सांगीतले.  या सभेस काँग्रेस-वंचित बहुूजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभाग क्रमांक ५ मधील मतदार बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR