परभणी : पेडगाव येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद नगर मधील नागरिकांच्या दळणवळणाची सुविधा अधिक चांगली व्हावी या उद्देशाने करण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉक कामाचे उद्घाटन काँग्रेसचे परभणी तालुकाध्यक्ष शेख सलमान यांच्या हस्ते करण्यात आले. या कामामुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी अधिक चांगला व सुकर मार्ग उपलब्ध होणार आहे. विशेषत: पावसाळ्यात रस्त्यावर होणारा चिखल, खड्डे या त्रासापासून नागरिकांची सुटका होण्यास मदत होणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी पेडगावचे सरपंच आशिष हरकळ, ग्रामपंचायत सदस्य मोबीन कुरेशी, हरीश पठाण, करण कांबळे, शेख फरान, पांडुरंग पवार, लिंबाजी पवार, गोविंद कांबळे, गौतम पवार, सचिन कांबळे, अमोल जोगदंड, मारुती पवार, अमोल पवार यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी परिसरातील विविध विकासकामे, रस्ते, पाणी, स्वच्छता आणि नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांबाबतही चर्चा केली. स्थानिक नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य देण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
पेडगावच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात आहे, असे यावेळी सांगण्यात आले. पेव्हर ब्लॉकच्या कामामुळे क्रांतिवीर लहुजी वस्ताद नगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. परिसराच्या विकासाला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
















