औसा : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सत्ता काळातील महागाई, बेकारी, भ्रष्टाचार, कमिशनखोरी याला जनता कंटाळली असल्याचे सांगून ‘सिंहासन खाली करो कि जनता आती है’, या रामधारीसिंह (दिनकर) यांच्या कवितेचा संदर्भ देत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पदाधिका-यांनी परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज व्हावे, जनता तुमच्या सोबत असल्याचे औसा तालुक्यातील उजनी येथील प्रचार सभेत बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी उजनी येथे उजनी जिल्हा परिषद गट व उजनी, शिवली पंचायत समिती गणातील काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. त्या प्रसंगी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते श्रीशैल उटगे, उजनी जिल्हा परिषद गट काँग्रेस आघाडीचे उमेदवार नारायण लोखंडे, श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचिन पाटील, विद्याताई पाटील, अमर खानापुरे, समद पटेल, औसा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण बाबळसुरे, चाँदपाशा इनामदार, उदयसिंह देशमुख, राजेंद्र यादव, हरिभाऊ गायकवाड, प्रताप कदम, शेरखां पठाण, असगर पठाण, रामचंद्र शिंदे, अशोक करंडे, सोमनाथ करंडे, तानाजी पाटील, गोरख सावंत, प्रकाश मिरगे, दगडूसाहेब पडिले, बालाजी साळुंके, अमित पाटील, दीपक राठोड, निर्गुण साळुंके, संजय लोंढे, संतोष मेंडेकर, बाळासाहेब सांगवे, दिनेश मेंडेकर, बंडाप्पा ढासले, दिगंबर कांबळे, ख्वॉजा शेख, व्यंकट क्षीरसागर, मन्सूर रुईकर, रवींद्र आळणे, अजित शिंदे, जिल्हा परिषद गट उजनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार नारायण लक्ष्मणराव लोखंडे, आशिवच्या उमेदवार सईताई पृथ्वीराज गोरे, उजनी पंचायत समिती गणातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार शिवाजी धोंडीराम चव्हाण, शिवलीच्या उमेदवार वेणुबाई राजेंद्र यादव, तुंगीचे उमेदवार दशरथ सर्जे, आशिव उमेदवार धनराज बनसोडे आदींसह काँग्रेस आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उजनी येथील बाजार चौक येथे राजमाता मासाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, उजनी काँग्रेसचा बालेकिल्ला. येथील ग्रामदैवत गणेशनाथ महाराज यांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होत असल्याचे सांगत त्यांनी नारायण आबा लोखंडे आणि उजनीच्या काही आठवणींना उजाळा दिला. उजनी गावात यापूर्वी ज्या योजना मंजूर झाल्या, त्या काँग्रेसच्या काळात नारायण आबा लोखंडे यांच्या प्रयत्नातून झाल्या, असे म्हणावे लागेल.
लातूर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटाचे व पंचायत समिती गणाचे स्वतंत्र असे विकासाचे मॉडेल काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले असून, तसा जाहीरनामा आम्ही नुकताच प्रसिद्ध केला आहे. यापूर्वी आपल्याला आपल्या कामासाठी जिल्हा परिषदेत जावे लागत होते, पण आपली सत्ता जिल्हा परिषदेत आल्यानंतर ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक्रमाच्या अंतर्गत लोकाभिमुख आणि स्वच्छ, पारदर्शक कारभार करायचा आहे. यासाठी आपली भक्कम साथ तितकीच महत्त्वाची असून ऊस उत्पादक शेतक-यांची आर्थिक उन्नतीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. यासाठी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मांजरा परिवार सक्षमपणे कार्य करीत आहे. सरकारचा नुकताच एक अहवाल तयार झाला असून, राज्यात ऊस उत्पादक शेतक-यांच्या उसाला ३ हजार रुपयांपेक्षा अधिक भाव देणारे ५६ साखर कारखाने असून, एकट्या मांजरा परिवारातील ६ कारखान्यांचा यात समावेश असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
पुढे बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले, विरोधक म्हणतात आम्ही निधी आणला, पण त्यांनी आणलेला निधी हा तुमच्या भागाच्या विकासासाठी नाही, तर त्यांच्या गुत्तेदारांसाठी आणला होता. यांना आपली अजिबात काळजी नाही, हे आपण ध्यानात घ्यावे. आज प्रत्येक शासनाच्या योजनेत अर्जदाराला लाच दिल्याशिवाय लाभ मिळत नाही. प्रत्येक योजनेचे ‘रेट कार्ड’ लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीत ठरलेले असून, लातूरसह राज्याचा संपूर्णपणे बट्ट््यबोळ या भाजप सरकारने आणि त्यांच्या प्रशासकाने करून ठेवला आहे.
आपल्याला यात सुधारणा करायची असून याची सुरुवात आपल्या गावापासून करावी लागेल. यासाठी लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही आपल्यासाठी मिळालेली सुवर्णसंधी असून याचा लाभ मतदारांनी घ्यावा. सर्वसामान्य कुटुंबातील, ठेकेदारी न करणारे आणि अडचणीत धावून येणारे उमेदवार आम्ही काँग्रेस आघाडीच्या वतीने दिलेले आहेत. त्यांना आपण भरघोस मतरूपी आशीर्वाद देऊन आपल्या गावच्या विकासासाठी निवडून द्यावे. आपल्या भागाच्या विकासासाठी निधीची अजिबात कमतरता भासू दिली जाणार नाही, असा शब्द त्यांनी उपस्थित मतदार बंधू, भगिनींना दिला.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना त्यांच्या लोकाभिमुख कामामुळे सर्व महाराष्ट्र आबा म्हणून ओळखत असे, त्याच पद्धतीचे कार्य असलेले नारायण लोखंडे यांना लातूर जिल्ह्यातील लोक आबा म्हणून संबोधतात, असे सांगून काँग्रेस पक्षाने अशा लोकाभिमुख व्यक्तींना उमेदवारी दिली आहे त्यामुळे, लातूर महापालिकेप्रमाणेच जिल्ह्यातील जनतेने स्वच्छ प्रतिमेच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करून जिल्हा परिषदेवरही काँग्रेसचा झेंडा फडकवावा, असे आवाहन याप्रसंगी आमदार देशमुख यांनी बोलताना केले.
या जाहीर प्रचार सभेत काँग्रेसचे नेते श्रीशैल उटगे, काँग्रेस आघाडीचे उमेदवार नारायण लोखंडे, अमर खानापुरे यांनी मनोगत व्यक्त करून काँग्रेस आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन केले. यावेळी अॅड दीपक राठोड, तानाजी जाधव, यांच्यासह उजनी जिल्हा परिषद गट व गण यासह शिवली पंचायत समिती गणातील मतदार बंधू, भगिनी, काँग्रेस आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला भगिनी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

