21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeमहाराष्ट्रकाँग्रेस-भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच!

काँग्रेस-भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच!

सत्ता स्थापनेसाठी भाजपच्याही हालचाली सुरू

चंद्रपूर : प्रतिनिधी
चंद्रपूर महापालिकेतील सत्तेचा तिढा सुटता सुटत नसून काँग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यातच काँग्रेसला बाजूला करत भाजपने सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्याने २४ तासांत अशक्य ते शक्य होईल, अशी चिन्हे आहेत. भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर महापालिकेत भाजप सत्ता स्थापन करेल, असा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यात फडणवीसांनी हिरवा कंदिल दाखवल्याचा दावा केला आहे. त्यामुळे काहीही झालं तरी मतदारांनी दुस-या क्रमांकाची मते दिलेल्या भाजपला चंद्रपूर महापालिकेत पहिले स्थान मिळवायचे आहे.

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची १६ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. तेव्हापासून चंद्रपूर महापालिकेत बहुमताचा तिढा कायम आहे. चंद्रपूर महापालिकेत एकूण ६६ जागा आहेत. यातील सर्वाधिक जागा काँग्रेसला आणि दुस-या क्रमांकाच्या २३ जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. या निवडणुकीत ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढले होते. त्यांना अनुक्रमे ६ आणि २ जागांवर विजय मिळाला आहे. तर शिवसेना, बहुजन समाज पार्टी आणि एमआयएमला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. शिवाय ५ अपक्ष उमेदवार नगरसेवक झाले आहेत.

चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाला ६ आणि वंचित बहुजन आघाडीला २ जागा मिळाल्या आहेत. हे दोन्ही पक्ष युतीत लढले होते. शिवाय त्यांना दोन अपक्षांनी साथ दिल्यामुळे या १० नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला आहे. आता काँग्रेस किंवा भाजपला सत्ता स्थापनेसाठी या गटाची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि वंचित काँग्रेसला पाठिंबा देतील, असा दावा काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर करत आहेत. तर असाच दावा भाजप आमदार किशोर जोरगेवारदेखील करत आहेत. त्यामुळे चंद्रपूरमध्ये ठाकरे गट किंगमेकरच्या भूमिकेत आहे. त्यांनी नुकतीच ‘मातोश्री’वर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. शिवाय ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहेत. त्यामुळे चंद्रपूरमध्ये कधीही कुणाचेही पारडे जड होऊ शकते.

काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील उघड वादामुळे विजयी २७ पैकी १३ नगरसेवक खासदार प्रतिभा धानोरकर यांचे तर १४ नगरसेवक काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व मानणारे आहेत. त्यांनी दोन गट नोंदले आहेत. दोघांच्या भांडणात काँग्रेस सत्ता मिळवेल की, ना मला ना तुला सत्ता भाजपला असे काही होईल, हे सांगता येत नाही. तरीही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मध्यस्थीने त्यांच्यातील वाद मिटला आहे. त्यांच्यातील सहमतीनुसार प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष वडेट्टीवार गटाचा असणार आहे.

बहुमतासाठी ७ नगरसेवकांची गरज
काँग्रेसकडे २७ नगरसेवक असून बहुमतासाठी ७ नगरसेवकांची गरज आहे. त्यासाठी त्यांनी जवळचा मित्र म्हणून ठाकरे गट आणि वंचितशी संवाद साधला आहे. दोघांचे मिळून ८ नगरसेवक आहेत. तर भाजपकडे २३ नगरसेवक असून त्यांना ११ सदस्यांची गरज आहे. त्यांनीही ठाकरे गट आणि वंचितशी संपर्क साधल्याचे कळते. शिवाय अपक्षांनाही ते आपले करण्याचा प्रयत्न करत आहेत.
\\\

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR