22.6 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeलातूरकाँग्रेस-वंचित आघाडी नवा इतिहास घडवेल 

काँग्रेस-वंचित आघाडी नवा इतिहास घडवेल 

उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला विश्वास 
लातूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाने कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी तडजोड केली नाही. डॉ. आंबेडकर यांचा विचार आणि संविधानाला मानणा-या काँग्रेस पक्षाने लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केली. या निवडणुकीत काँग्रेस-वंचित आघाडी नवा इतिहास घडवेल, असा विश्वास माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.
लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दि. ४ जानेवारी रोजी सायंकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक २ मधील उमेदवार अंकिता भडीकर, सचिन बंडापल्ले, शहेनाज गोलंदाज, फारुक शेख, ३ मधील मनिषा बसपुरे, विजयकुमार साबदे, जरिनाबी शेख, विकास कांबळे, ४ मधील सचिन गायकवाड, गोरिबी बागवान, कौसर शेख, अहेमदखां पठाण, ६ मधील दिनेश गोजमगुंडे, सुनिता चाळक, मंजूला अग्रवाल, गिरीश ब्याळे आणि ७ मधील निकिता सोमवंशी, रुबिना तांबोळी, आतिष चिकटे, युनूस मोमीन या काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित ऐतिहासिक सभेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख बोलत होते. या सभेस वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, काँगे्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सचिव मुफ्ती वसीम सय्यद, वंचितच्या महिला आघाडीच्या मंजूताई निंबाळकर, वंचितचे मराठवाडा सचिव संतोष सूर्यवंशी, वंचितचे शहर जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या  प्रचाराचा श्रीफळ आज तुमच्या साक्षीने वाढवला जात आहे. जिवाभावाची माणसे काय असतात, याची प्रचिती आपल्याला पाहिल्यानंतर होते, असे नमूद करून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे अधिकार दिले, यामुळे आपण लातूरला सुरक्षित ठेवू शकलो, याची आठवण करून दिली. लातूरच्या या पूर्व भागाचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केले. या पूर्व भागातील अनेक विकासकामे त्यांनी केले. लातूरमधील प्रत्येक विकास कामातील विटेला विचारले तर तीही हेच सांगेल की, या विकास कामाला आदरणीय विलासराव देशमुख यांचे हात लागले आहेत.
लातूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने आता लातूरकडे काही नतद्रष्ट लोक वाकड्या नजरेने पाहत असून याना दूर ठेवण्याचे काम या निवडणुकीत आपल्याला करायचे आहे. लातूरमध्ये अनेक विकास कामे आम्ही आणलेल्या निधीतून होत आहेत. पण प्रशासकराज असलेल्या लातूर मनपाने व सरकारने ही सर्व कामे करणारा कंत्राटदार गुजरातमधला आणून बसवण्याचे काम केले. आज आपण पाहतो, मनपातील एकही काम पैसे घेतल्याशिवाय होत नाही. हे दुर्दैवाने सांगावे लागत आहे.  आजची ही निवडणूक प्रचारसभा ऐतिहासिक असून ही सभा आगामी निवडणुकीतही इतिहास घडवेल, याचा विश्वास त्यांनी व्यक्त करीत या निवडणुकीत काँग्रेस-वंचितची लढाई ही भाजपासोबत आहे. इतर लिंबूटिंबू आहेत. या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचा स्ट्राईक रेट ९० टक्के असल्याचे स्पष्ट केले.
जिंदगी मे एकही वसूल रखना, 
यारी में गद्दारी नही और गद्दारोसे कभी यारी नही 
असे म्हणत विरोधकाना व पक्ष सोडून गेलेल्यांना त्यांनी लक्ष केले.
दरम्यान कोविड काळात आमच्या सर्व नगरसेवकानी आपले जीव धोक्यात घातले. ज्यात दत्ता मस्के, श्रीमती उषा भडीकर यांना आपला जीव गमवावा लागला , असे म्हणत दिवंगत दत्ता मस्के व श्रीमती भडीकर यांच्या कार्याची आठवण करून दिली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपण जेवढे प्रेम आम्हाला आमच्या उमेदवाराना दिले, त्यापेक्षा अधिक प्रेम मनपाच्या निवडणुकीत आपण काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना द्यावे आणि आपल्या माणसांना प्रचंड मताधिक्क्याने या सर्वसामान्य घरातील कर्तबगार उमेदवारांना लातूरच्या महानगरपालिकेत पाठवावे, असे आवाहन उपस्थित सर्व मतदारांना त्यांनी केले.
यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, अभय साळुंके, मंजूताई निंबाळकर, मुफ्ती वसीम सय्यद, सचिन गायकवाड, आतिष चिकटे, यूनूस मोमीन, ख्वॉजाबानू अन्सारी यांची भाषणे झाली. दरम्यान माजी मंत्री, आमदार अमित देशमुख, वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि सर्व मान्यवरांनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले तसेच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज युवा नेते सुजात आंबेडकर यांना प्रथेनुसार समता सेनेच्या वतीने सलामी देण्यात आली.
या वेळी हमीद शेख, चांदपाशा इनामदार, मोहन माने, राजा माने, विवेक सिरसाट, सतीश हलवाई, अविनाश बट्टेवार, राजेश गुंठे, अजित बागवान, करीम तांबोळी, चंद्रकांत चिकटे, आकाश इंगळे, चंद्रकांत मद्दे, मारुती पांडे, रफिक सय्यद, बालाप्रसाद बिदादा, सत्तार शेख, गोविंद देशमुख यांच्यासह काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवार तसेच पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधानाचा अवमान करणा-या 
भाजपाला आता घरी बसवा
प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात आणि जयभीमच्या घोषणांत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचे सभास्थळी आगमन झाले. यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले की, भाजपाने लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक न घेता त्यांच्या मर्जितील प्रशासक मनपात बसवले आणि प्रशासकाच्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचार केला. पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक घेणे आवश्यक होते. परंतु भाजपाच्या भ्रष्ट सत्ताधा-यांनी निवडणुका न घेऊन संविधानाचा अवमान केला. संविधानाचा अवमान करणा-या भाजपाला लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभूत करुन त्यांना घरी बसवा, असे आवाहन केले.
भाजपाचे भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे. काँग्रेस-वंचितने स्वच्छ प्रतिमेचे, सर्वसामान्य उमेदवार दिले आहेत. त्यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून देऊन लातूर मनपात पाठवा. वंचित बहुजन आघाडीत मेहनत घेणा-या कार्यकर्त्यांना आणि त्यातही युवकांना व बहुजनांचे उमेदवार देऊन त्यांना सत्तेत आणण्याचे व त्यांना बळ देण्याचे काम बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीने केले असून यापुढेही करीत राहील, असे म्हणत कार्यकर्त्याना आश्वस्त केले. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ही माजी मंत्री, आमदार अमित देशमुख आणि ज्येष्ठ नेत्यामुळे शक्य झाली, हे त्यांनी आवर्जून सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR