मुंबई : प्रतिनिधी
गेल्या महिन्यापासून कांद्याचे दर ढासळले होते; पण आता ऐन दिवाळीत मक्याचे दरही ढासळल्याने शेतक-यांवर संकट कोसळले आहे. शेतकरी ज्वारी, बाजरी, गहू या भुसार धान्याबरोबरच कांद्याची लागवड करीत होता; पण ज्यावेळी शेतकरी कांद्याचे उत्पादन बाजारात घेऊन जातो नेमका त्याचवेळी कांद्याचा बाजारभाव पडलेला असतो.
त्यामुळे शेतक-यांनी कांदा पिकासाठी घातलेले भांडवलदेखील मिळत नाही. आत्ता काही शेतकरी कांद्याऐवजी मक्याचे पीक घेत होते. त्याला गेल्या वर्षापासून समाधानकारक बाजारभाव मिळत होता; पण गेल्या १५ दिवसांपासून व्यापा-यांनी मक्याचे भावही पाडले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतक-यांवर दुहेरी संकट कोसळले असून, दिवाळी कशी पार पाडायची याची चिंता शेतक-यांना सतावत आहे.
मे महिन्यापासून पाऊस सुरू आहे, त्यात कसेबसे मक्याचे उत्पन्न घेतले. पावसाचे पाणी शेतात साठले असताना त्यातून कणसे काढून कितीतरी दिवस सुकवून कणसांची मळणी केली.
प्रतिकूल परिस्थितीत म्हणावे तसे उत्पादन मिळाले नाही. यंदाची दिवाळी पार पडेल या आशेवर शेतकरी होता. मात्र, आता मक्याचे भाव पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
















