किनगाव : प्रतिनिधी
पावसाने दडी मारल्याने किनगाव व परिसरात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून, शेतक-यांची खरीप पिके हातची गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, मजुरांना २५ हजार रुपये मदत करावी तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. तुम्ही सरकार म्हणुन बैठका घेऊन काजु बादामच खाता का? असा सवाल करत नूसते कागदी घोडे नाचवू नका, दुष्काळ जाहीर करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली.
आमदार रोहित पवार यांनी दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या अहमदपूर तालुक्यातील किनगावला भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतक-यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतक-यांच्या व्यथा ऐकून घेत पिकांचे झालेले प्रत्यक्ष नुकसान, पावसाची परिस्थिती आणि शेतीसमोरील संकटाची माहिती घेतली. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. या पाहणीदरम्यान आमदार रोहित पवार यांनी किनगाव येथील शेतकरी विनोद अशोक शेळके यांच्या ३ एकर शेतीची पाहणी केली. शेळके यांनी शेतात सोयाबीन व तूर पिकांची लागवड केली होती. मात्र, पावसाअभावी पिकांना आवश्यक पाणी न मिळाल्याने सोयाबीन व तूर करपून गेल्याचे पाहणीदरम्यान स्पष्ट झाले.
यानंतर आमदार रोहित पवार यांनी पाटोदा व कोपदेव हिप्परगा येथे के. टी. बंधारा व पाझर तलावांची पाहणी केली. तसेच काजळ हिप्परगा येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक पाहणी केली आणि शेतक-यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि शेतमजुरांसमोर निर्माण झालेल्या संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या दुष्काळ पाहणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सचिव सोमेश्वर कदम, संजय शेट्टे, निलेश देशमुख, संतोष बोराडे, भरत सूर्यवंशी, केदार काडवदे, सरपंच करूणा धम्मानंद कांबळे, संग्राम पवार, चंद्रकांत मद्दे, विलास पाटील, साजिदभाई, आर. आर. बोडके आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















