कागल : कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत कट्टर विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांची युती झाल्याने मोठी उलाथापालथ झाली.
दरम्यानच आज, बुधवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी प्रभाग नऊमधील दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सेहरनिदा नवाज मुश्रीफ या बिनविरोध निवडून आल्या. सेहरनिदा या मंत्री हसन मुश्रीफ यांचे कनिष्ठ बंधू माजी नगरसेवक अन्वर मुश्रीफ यांच्या स्नुषा आहेत.
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार नूरजहाँ निसार नायकवडी व अपक्ष मोहबतबी अब्दुलरशीद शेख यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने सेहरनिदा मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर मुश्रीफ समर्थकांनी गैबी चौकात फटाक्यांची आतषबाजी करीत विजयाच्या घोषणा दिल्या. नगरपालिकेच्या निवडणुकीत मुश्रीफ-घाटगे यांची युती झाल्याने विरोधात शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक लढत आहेत.

