कात्रज : प्रतिनिधी
शनिवारी कात्रज चौक तसेच कात्रज-कोंढवा रोड या ठिकाणी पुणे महानगरपालिका आयुक्त, महानगरपालिकेचे अधिकारी तसेच आमदार योगेश टिळेकर यांचा पाहणी दौरा होता. यादरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्याकडून २५ ते ३० कार्यकर्ते घेऊन आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनादरम्यान वसंत मोरे व त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकांनी घोषणाही दिल्या होत्या. कात्रज चौकातील संजय गुगळे यांची ३९ गुंठे जागा पालिकेने ताब्यात घेऊन मोबदला म्हणून २१ कोटी दिले.
मात्र प्रत्यक्षात जागेवर ३९ गुंठे क्षेत्र भरत नसून पन्नास वर्षांपूर्वी ताब्यात आलेल्या पंपिंग स्टेशन व राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या जागेचे पैसे दिले का? पालिकेने पैसे दिलेली जागा मोजून दाखवावी. या सर्व प्रकारची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच १९७२ मध्ये कात्रज गावठाणलगतचा दुष्काळात तयार झालेला आणि उपयुक्त रस्ता निवासी झोन होतो कसा.. गावाचा रस्ता बंद करण्याची दिवास्वप्नं पाहू नका असा इशारा शिवसेने(उबाठा)चे नेते वसंत मोरे यांनी दिला होता. तसेच उपस्थित अधिका-यांना याचा जाब विचारण्यात आला होता. त्यानंतर वसंत मोरे यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्याबद्दल जमावबंदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल जो पुणे महानगरपालिका आयुक्त व आमदार योगेश टिळेकर यांचा दौरा होता, त्यासाठी आमचा विरोध नव्हता. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून सर्वपक्षीय नगरसेवकांना यांनी का डावलले? मागील पंधरा वर्षांपासून आम्ही कात्रज व परिसरात दिवस-रात्र झटून कामे करत आहोत ते यांना दिसत नाही का? कात्रजमध्ये यांचे काय योगदान आहे हे यांनी दाखवून द्यावे. मागील अनेक वर्षांपासून कात्रज-कोंढवा रोड रखडला असल्याचे वसंत मोरे म्हणाले.