पुणे : प्रतिनिधी
राज्यातील सहकारी साखर कारखानदारीला अडचणीत आणले जात असून, खासगी कारखाने वाढत चालले आहेत.तर दुसरीकडे साखर कारखान्यांची क्षमता वाढत असली,तरी त्यातील कामगारांची संख्या मोठयÞा संख्येने कमी होत चालल्याची खंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे व्यक्त केली. कारखानदारी व साखर कामगार टिकवण्यासाठी या प्रश्नी एकत्र बसून चर्चा करावी लागेल.त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारलाही यामध्ये विश्वासात घ्यावे लागेल, अशी सूचना त्यांनी केली.
‘साथी किशोर पवार प्रतिष्ठान’ व ‘लोकमान्य सोसायटी’तर्फे साथी किशोर पवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘साखर उद्योग व कामगार चळवळ अनुभव व दृष्टी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात,राज्य साखर कामगार प्रतिनिधी अध्यक्ष तात्यासाहेब काळे,प्रतिष्ठान’चे अध्यक्ष व डॉ.किरण ठाकुर,सचिव वंदना पवार, उपाध्यक्ष अंकुश काकडे व अन्य उपस्थित होते.
मनोगतात साथी किशोर पवार यांच्या कार्याचा गौरव केला.ते म्हणाले,साथी किशोर पवार यांनी उभे आयुष्य साखर कामगारांची चळवळ आणि समाजवादी विचारांच्या जोपासनेसाठी वेचले.स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा,सीमालढा ते कामगार चळवळीपर्यंत प्रत्येक संघर्षात ते अग्रभागी असायचे. कारखानदारीत संघर्षाच्या ठिकाणी संघर्ष करायचा,तर कुठे कितपत ताणायचे, याचे तारतम्य त्यांनी बाळगले.हाच दृष्टीकोन पुढे ठेऊन कारखाना व कामगारांचे हित जपणे, हीच त्यांना आदरांजली ठरेल.
भारतात साखर धंदा महत्त्वाचा आहे.एकेकाळी कापड गिरण्या होत्या.पण, गिरणी कामगार देशोधडीला लागला. तिथेही एस. एम. जोशी यांच्या विचारांनी काम करणारे किशोर पवार यांच्यासारखे कामगार नेते होते. सहकार क्षेत्रात खासगी कारखाने वाढत आहेत.तर सहकारी कारखाने कमी होत आहेत.पूर्वीही खासगी कारखाने होते, ते महाराष्ट्रातल्या लोकांचे होते. कारखान्यात जो कामगार घाम गाळतो, तो टिकला पाहिजे.
सध्या उलटे चित्र बघायला मिळते. कारखान्यांची साईज वाढली.२० हजार टन क्षमतेचे कारखाने झाले.पण,कामगारांची संख्या १५० ते २०० पर्यंत मर्यादित झाली.हे चिंताजनक आहे.म्हणूनच या प्रश्नावर एकत्र बसून चर्चा करावी लागेल.असे ते म्हणाले. डॉ. ठाकुर म्हणाले, की किशोर पवार यांनी साखर कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी जीवाचे रान केले. शरद पवार हे साखर सम्राटांचे अध्यक्ष,तर साथी किशोर पवार हे कामगार संघटनेचे अध्यक्ष होते. दोन पवारांचेच राज्य महाराष्ट्रावर असायचे.

