निलंगा : प्रतिनिधी
लातूर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावरील तळखेड पाटीजवळ कार आणि टमटम यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत ५जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्यावरील मोठा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, अपघातानंतर ‘१०८’ रुग्णवाहिकेशी वारंवार संपर्क साधूनही रुग्णवाहिका डिझेलअभावी घटनास्थळी पोहोचू शकली नाही. त्यामुळे जखमींना तब्बल अर्धा तास रस्त्यावरच वेदनांनी तडफडत पडून राहावे लागले.
दि. १७ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास टमटम (एमएच १४ जेपी ६७२३) औरादहून निलंग्याकडे येत होती तर कार (एमएच १२ पीएन ३९२३) निलंग्याकडून औरादकडे जात होती. तळीखेड पाटीजवळ रस्त्यावर मोठा खड्डा असल्याने कार चालकाने वाहन अचानक उजव्या बाजूला घेतले. त्याचवेळी समोरून येणा-या टमटमवर कारची जोरदार धडक झाली. यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघातात टमटममधील लक्ष्मीबाई प्रकाशराव मसलगे यांचा पाय गंभीररीत्या जखमी झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रकाश नरशिंगराव मसलगे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. इंदू प्रकाश मसलगे व सिंधू प्रकाश मसलगे या दोघींना किरकोळ मार लागला आहे.
कारमधील मीनाक्षी पुरुषोत्तम मंत्री यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन हाड फ्रॅक्चर झाले आहे. पुरुषोत्तम दगडू मंत्री, वैष्णवी जुगलकिशोर मंत्री आणि वसुधा जुगलकिशोर मंत्री यांनाही हात, पाय व डोक्याला गंभीर मार लागला आहे. अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ ‘१०८’ क्रमांकावर संपर्क साधून शासकीय रुग्णवाहिका बोलावली मात्र रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण देत सेवा उपलब्ध होऊ शकली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. अखेर स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांनी पुढाकार घेत खासगी वाहनांमधून जखमींना निलंगा उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असलेल्या मीनाक्षी मंत्री आणि लक्ष्मीबाई मसलगे यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले.
















