Homeपरभणीकार-दुचाकीच्या भीषण अपघातात बहिण, भाऊ जागीच ठार

कार-दुचाकीच्या भीषण अपघातात बहिण, भाऊ जागीच ठार

परभणी : तालुक्यातील झरी पासून जवळच असलेल्या जिंतूर मार्गावरील कॅनलजवळ मंगळवार, दि.७ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन बहिण, भावांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू पावले बहीण, भाऊ हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वटकळ येथील रहिवासी असल्याचे समजते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, झरीकडून जिंतूरकडे जाणारी मोटरसायकल एमएच ३८ टी २२३१ व जिंतूरकडून झरीकडे येणारी एचआर २६ डीएफ ७८९० नंबरच्या कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने या दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील शितल माधव व्यवहारे, श्रीराम माधव व्यवहारे हे दोघे बहिण, भाऊ जागीच ठार झाले.

झरी प्राथमिक आरोग्य केंद्राची अ‍ॅम्बुलन्स घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन चालक दिनेश बिरगड यांच्यासह शिवाजी देशमुख, इब्राहीम ईसाक इनामदार, गोपाळ देशमुख व ग्रामस्थांनी दोघांनाही परभणी शासकीय रुग्णालयात पाठविले. या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस उपअधीक्षक दिपककुमार वाघमारे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि. जीवन राजगुरू, अभिजीत आडके, मोटार वाहन निरीक्षक हनुमंत सुळे, शहर वाहतूक शाखेचे सपोनी. बेले व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान हा अपघात कार समोरील गाडीला ओव्हरटेक करत असताना समोरून येणारी दुचाकी न दिसल्यामुळे झाल्याचे समजते. या अपघातानंतर कारने अपघातस्थळापासून मोटार सायकल ३० ते ४० मीटर अंतरापर्यंत घासत नेली होती.

हा अपघात कारचालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याची चर्चा नागरिकांमधून होताना दिसून येत होती. यावेळी शेकडो नागरिक अपघातस्थळी बघ्याची भुमिका घेत उभा होते परंतू अपघातग्रस्तांना मदत करण्यास पुढे येण्यास धजावत नव्हते. नागरिकांनी पोलिसांची भिती मनात न बाळगता अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन जि. प. सदस्य दिलीपराव देशमुख यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR