27.7 C
Latur
Friday, July 18, 2025
Homeसोलापूरकाळ्या बाजारात शासकीय तांदूळ घेऊन जाताना तिघांना अटक

काळ्या बाजारात शासकीय तांदूळ घेऊन जाताना तिघांना अटक

सोलापूर : शहरातील रामवाडी येथील शासकीय धान्य गोदाम येथून खासगी वाहनात शासकीय तांदूळाची पोती भरून ती काळ्या बाजारात नेत असताना तिघांना शहर पोलिसांनी पकडले. याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाधर नवलिंग खोबरे, राहुल तुळशिराम गंगावणे आणि अल्लाउद्दीन गुलाबसाब शेख (रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांना न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. रामवाडी येथील शासकीय धान्य गोदामातून काही लोक खासगी वाहनांत शासकीय तांदूळाची पोती भरून ती काळ्या बाजारात नेत असल्याची माहिती पोलिस आयुक्त एम राजकुमार यांना मिळाली होती. त्यावेळी पोलिस आयुक्तांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यातील एका पथकाला याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार फौजदार चावडी पोलिस ठाण्यातील पथकाने रामवाडी येथील गोदामात जाऊन सरकारी परवानाधारक वाहनातून परवाना नसलेल्या खासगी वाहनांत तांदूळाची पोती भरताना गंगाधर खोबरे, राहुल गंगावणे व अल्लाउद्दीन शेख या तिघांना ताब्यात घेतले व सदर बझार पोलिसांना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर सदर बझार पोलिसांनी घटनास्थळी येऊन तिघांना ताब्यात घेऊन ४ लाख ६० हजार रुपये किंमतीचा २३० पोती तांदूळ जप्त केला. याबाबत महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरुन सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचोळी एमआयडीसी येथून रामवाडी येथील शासकीय धान्य गोदाम येथे सार्वजनिक वितरण प्रणणातील ४ लाख ६० हजार रुपये किंमतीचा २३० पोते तांदूळ गंगाधर खोबरे याने त्याच्याकडील एम एच १३ बी ३३९६ क्रमांकाच्या मालट्रकमधून आणला.

तो तांदूळ गोडाऊनचा मुनीम राहुल गंगावणे याच्या सांगण्यावरून अल्लाउद्दीन पटेल याच्या एमएच १३ एएक्स २३८९ क्रम ह्यांकाच्या आयशर ट्रकमध्ये काळ्या बाजारात विकण्यासाठी भरला जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.अल्लाउद्दीन शेख याच्या वाहनातून शासकीय तांदूळ वाहतूक परवानगी नसल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पोलिस निरीक्षक लकडे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR