30.2 C
Latur
Friday, April 10, 2026
Homeनांदेडकावलगुडा (बु) येथे २५० जणांना अन्नातून विषबाधा

कावलगुडा (बु) येथे २५० जणांना अन्नातून विषबाधा

सर्वजण उमरी ग्रामीण रुग्णालयात, आरोग्य यंत्रणा सतर्क

उमरी : कैलास सोनकांबळे
उमरी तालुक्यातील कावलगुडा (बु) येथे मंदिरात आयोजित सामूहिक भोजन कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणावर अन्न विषबाधेची घटना घडली. या घटनेत सुमारे २५० ग्रामस्थांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मंगळवारी गावातील मंदिरात आंबील व वरण,भाताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भोजनात सहभागी झालेल्या अनेकांना सायंकाळपासून अस्वस्थ वाटू लागले. सुरुवातीला काहींनी खासगी दवाखान्यातून औषधे घेतली, मात्र प्रकृती अधिकच बिघडू लागल्याने रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रुग्णांना येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयात एकाच वेळी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला. डॉक्टर, परिचारिका, १०८ आपत्कालीन सेवा पथक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना तातडीने पाचारण करून उपचार सुरू करण्यात आले. रुग्णांमध्ये महिला, पुरुष, वृद्ध तसेच लहान मुलांचाही समावेश आहे.

रुग्णसंख्या वाढल्यामुळे उपलब्ध बेड अपुरे पडले असून काही रुग्णांना रुग्णालयाच्या व्हरांड्यातच सलाईन लावून उपचार देण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी अ‍ॅम्ब्युलन्सचीही व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींनीही घटनास्थळी धाव घेत रुग्णांसाठी औषधे व सलाईनची व्यवस्था केली. मात्र, काही डॉक्टर अनुपस्थित असल्याची बाब समोर आल्याने रुग्णांच्या नातेवाईकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अन्नातील कोणत्या घटकामुळे विषबाधा झाली याबाबत तपास सुरू आहे. आरोग्य विभागाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच धर्माबादच्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार मंजुषा भगत, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष क्रांती शिलेदार, अर्जुन शिंदे, डॉ चंदापुरे, पोलिस निरीक्षक जयप्रकाश गुठे, उमरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष कैलास देशमुख गोरठेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष देशमुख गोरठेकर, माजी नगराध्यक्ष संजीव कुलकर्णी, व्ही. पी के. समूहाचे सी ई.ओ संदीप कवळे पाटील, अमोल ढगे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव ताटे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन रुग्णांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

दरम्यान या घटनेची माहिती प्राप्त होताच नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनीही उमरी येथील ग्रामीण रुग्णालयास तातडीने भेट देऊन या गंभीर परिस्थितीची पाहणी केली व रुग्णांना अत्यावश्यक सेवा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी मोलाची मदत केली असल्याचे दिसून आले. दरम्यान, या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत कुठलीही जीवितहानी झाल्याचे दिसून आले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR