पालघर : प्रतिनिधी
काशिनाथ चौधरी यांच्या भाजप पक्षप्रवेशाला प्रदेश कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पत्र पाठवत काशिनाथ चौधरी यांचा पक्षप्रवेश तातडीने रोखण्याचे आदेश दिले. गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात भाजपने मागील काळात काशिनाथ चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याच चौधरी यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्यभरातून टीकेची झोड उडाली होती. त्याशिवाय विरोधकांनीही यावर रान उठवले होते.
पालघर साधू हत्याकांड प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन, स्थानिक पातळीवर झालेल्या काशिनाथ चौधरी यांच्या प्रवेशाच्या निर्णयाला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी तात्काळ स्थगिती दिल्याची माहिती प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली आहे. तपासातील अधिकृत नोंदींनुसार कोणत्याही चार्जशीटमध्ये त्यांचं नाव नाही, तरीही विषयाचा गांभीर्याने विचार करून काशिनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाला प्रदेश पातळीवरून तात्काळ स्थगिती देण्यात येत आहे, असेही बन म्हणाले.
काशिनाथ चौधरी हे पालघर जिल्ह्यातील एक राजकीय नेते आहेत. ज्यांचा उल्लेख प्रसिद्ध पालघर साधू हत्याकांडाशी संबंधित केला जातो. या घटनेनंतर भाजपने त्यांच्यावर मुख्य सूत्रधार म्हणून गंभीर आरोप केले होते, मात्र सध्या त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने वाद निर्माण झाला होता.

