यंदा पावसाने दगा दिल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीवर सर्व अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्याचा थेट परिणाम शहर व ग्रामीण भागात बाजारपेठेवर जाणवत आहे. वाढती महागाई आणि घटलेली क्रयशक्ती यामुळे ग्राहकांनी दैनंदिन गरजांव्यतिरिक्त इतर वस्तूंच्या खरेदीला मोठ्या प्रमाणात लगाम घातल्याचे चित्र आहे. बाजारपेठेतील व्यवहारांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन खरेदीचे वाढलेले प्रमाण, ग्राहकांची बदलती जीवनशैली, वाढता वाहतूक खर्च आणि महागाई यामुळे पारंपरिक बाजारपेठेतील व्यावसायिकांपुढे आव्हाने निर्माण झाली आहेत. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्थेची घडी विस्कटल्याने त्याचा परिणाम शहरी भागातील बाजारपेठेतील व्यापारावर होताना दिसत आहे. शेतकरी आणि शेतमजुरांकडून होणारी खरेदी मंदावली आहे. अत्यावश्यक वस्तू वगळता इतर खरेदीवर काटकसर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थानिक बाजारपेठा टिकल्या तरच शहरातील आणि गावातील अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आधार मिळणार आहे. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतक-यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
शेतीतून काहीच मिळणार नसल्याने कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, बांधकाम साहित्य, हॉटेल व्यवसाय तसेच इतर अनेक वस्तूंच्या खरेदीवर मर्यादा आल्या आहेत. सध्या सर्वसामान्य नागरिकांकडून प्रामुख्याने अन्नधान्य, भाजीपाला, औषधी आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचीच खरेदी केली जात आहे. सणासुदीच्या काळातही पूर्वीप्रमाणे उत्साहाने खरेदी करण्याऐवजी अनेक ग्राहक खर्चाचा विचार करून आवश्यक तेवढीच खरेदी करण्यावर भर देत आहेत. महागाईमुळे घरगुती बजेट कोलमडल्याने अनावश्यक खर्च टाळण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. वाढती महागाई आणि कमकुवत होत असलेल्या स्थानिक चलनामुळे रिझर्व्ह बँकेलाही धोरणात्मक बदल करावे लागले आहेत. बँकेने प्रमुख व्याजदर ५.५० टक्क्यांवर नेला. सुमारे चार वर्षांतील ही पहिलीच दरवाढ असल्याने भविष्यात आणखी दरवाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. अन्न आणि इंधन घटकांमधील वाढीव महागाईमुळे बँकेला ही दरवाढ करावी लागली असे सांगितले जाते.
इराण-अमेरिका युद्धासारख्या भू-राजकीय तणावामुळे तेलाच्या किमती वाढल्या, त्यामुळे भारतासह प्रमुख देशांना व्याजदर वाढवावे लागले. एल निनोमुळे अपुरा पाऊस आणि खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमती यामुळे महागाईचा बडगा उगारला गेला. देशात जुलै महिन्यापासून महागाईचा स्तर सतत वाढत चालला आहे. २०२६ या वर्षाच्या सुरुवातीला देशातील एकूण २२ वस्तू महागाईच्या दबावाखाली होत्या. त्यानंतर महागाईचा प्रभाव इतका वाढला की, ऑगस्टमध्ये एकूण ५१ वस्तू महागाईच्या कचाट्यात सापडल्या. भारतीय स्टेट बँकेने रिसर्च अहवालात म्हटले आहे की, रुपयाची कमजोरी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मुख्य धोका आहे. कच्चे तेल कंपन्यांकडून वाढती डॉलरची मागणी तसेच इतर कंपन्यांकडून असणारी मागणी रुपयाला कमजोर करत आहे. दिवसेंदिवस डॉलर मजबूत होत चालला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईची तीव्र झळ बसू लागली आहे. केंद्र सरकारकडून घेतल्या जाणा-या आढाव्यानुसार ४२ पैकी ४१ जीवनावश्यक वस्तूंच्या किरकोळ किमतीमध्ये गेल्या वर्षभरात मोठी वाढ झाली आहे.
या यादीत बटाटा हा एकमेव अपवाद ठरला असून त्याचे दर काही प्रमाणात घसरले आहेत. खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे किरकोळ महागाईचा दर सप्टेंबर महिन्यात ५.५ टक्क्यांवर पोहोचला, जो गत दोन वर्षांतील उच्चांक मानला जात आहे. अधिकृत आकडेवारीनुसार अन्नधान्य महागाईचा दर वार्षिक पातळीवर ७.७४ टक्क्यांवर गेला. यात कांद्याच्या दराने सर्वाधिक उसळी घेतली. कांद्याचे भाव ११३ टक्क्यांनी वाढले तर साखर २२ टक्के आणि सूर्यफूल १८ टक्क्यांनी महागले. तूर, हरभरा डाळीही भाव खाऊ लागल्या आहेत. खाद्यतेलांचेही भाव भडकले. सूर्यफुलाचे दर गतवर्षीपेक्षा १८ टक्क्यांनी, पाम तेल १५.२ टक्क्यांनी, सोयाबीन तेलाचे दर १४.६ टक्क्यांनी वाढले. मोहरी तेल १८८ रुपयांवरून २०४ रुपये प्रति लिटरवर पोहोचले. तांदळाचे दर सरासरी १२ टक्क्यांनी तर साखरेचे दर २२ टक्क्यांनी वाढले. दुष्काळामुळे नवे खरीप पीक बाजारात येण्याची आशा मावळली आहे.
















