किनगाव : जाकेर कुरेशी
तालुक्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई राष्ट्रीय महामार्ग रस्ते क्रमांक ५४८ हा दळण वळणासाठी सुरू करण्यात आला आहे मात्र हा रस्ता पूर्ण झाला नाही व सेवा – सुविधांचा अभाव असताना किनगाव ते दगडवाडीमध्ये वळणदार रस्त्यावरच टोलनाक्याची इमारत व शौचालय बांधकाम करण्यात आल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी हा टोल नाका सुरू होताच तो बंद पाडला आहे.
दि २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ठिक ८ वाजण्याच्या सुमारास वाहनधारकाकडून टोल वसूली सुरू झाली होती. हे ग्रामस्थांच्या लक्षात येताच किनगाव, दगडवाडी येथील ग्रामस्थांनी टोल नाक्यावर धाव घेऊन हा टोल नाका चर्चा करून व अडीअडचणी जाणून घेऊन सुरू करणे अनिवार्य होते. संबंधीतांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सडक परिवहन, राजमार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्या परवानगीने तो सुरू करण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिकांच्या
समस्या व अडचणी जाणून घेतल्या नाहीत.
टोल नाका सुरू करीत असताना टोल नाक्याचे रस्त्यावरील इमारत बांधकाम व वळण रस्त्यामुळे होणारे अपघात याबाबींकडे संबंधीतांनी दुर्लक्ष केले आहे. कोपरा गावाजवळील पुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे ते पुलाचे बांधकाम करावे व हा टोल नाका सुरू करण्याअगोदर सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात तेव्हांच टोल नाका सुरू करावा, असे ग्रामस्थांनी संबंधितांना सूचविले आहे.

