जळगाव : प्रतिनिधी
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर सिल्लोड येथे हल्ला झाला. सोमय्या हे ११०० बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या फसवणुकीसंदर्भात पुरावे सादर करण्यासाठी सिल्लोड येथील पोलिस व तहसीलदार कार्यालयात गेले असता, कार्यालयाबाहेर काही जणांनी त्यांच्या गाडीवर हल्ला चढवला. मात्र सीआयएसएफ कमांडोंच्या सतर्कतेमुळे जीव वाचल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सोमय्या म्हणाले, माझ्या गाडीवर पाच जणांनी हल्ला केला. हा प्रकार उद्धव ठाकरे गट, काँग्रेस किंवा अब्दुल सत्तार यांच्या निकटवर्तीयांनी केला असो, पण दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. सीआयएसएफ सुरक्षा दलाने वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे मी सुखरूप आहे.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सुमारे २.२४ लाख अपात्र व बेकायदेशीर व्यक्तींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे मिळवली आहेत. त्याविरोधात माझा लढा सुरूच राहणार आहे. सिल्लोडमध्ये पुरावे सादर केल्यानंतर सोमय्या जळगावात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली. सिल्लोड परिसरात मालेगावप्रमाणे वातावरण करण्याचा कट दिसून येतो आहे. बांगलादेशी व अपात्र लोकांविरोधात ठोस पावले उचलली नाहीत, तर मला थेट मुख्यमंत्र्यांशी बोलावे लागेल, असेही ते म्हणाले.
















