नाशिक : प्रतिनिधी
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश-विदेशातून महिला भाविक येतील. या महिला भाविकांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दिल्या. नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात डॉ. गो-हे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरिश सहाय, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर (नाशिक ग्रामीण), पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण (नाशिक शहर), नियोजन विभागाचे सहसंचालक योगेंद्र चौधरी, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गो-हे म्हणाल्या की, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महिला भाविकांची संख्या मोठी राहील. या पार्श्वभूमीवर महिलांच्या संरक्षणासाठी पुरेशा उपाययोजना कराव्यात. महिलांसाठी मदत केंद्रे, हिरकणी कक्ष, स्वच्छतागृहांची सुविधा असावी. तसेच दिव्यांगासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असेही उपसभापती डॉ. गो-हे यांनी सांगितले.
महिला अत्याचाराच्या घटनांच्या प्रतिबंधासाठी तालुकास्तरावर भरोसा सेल कार्यरत असतात. ज्या तालुक्यांमध्ये भरोसा सेल नसेल तेथे जिल्हास्तरीय भरोसा सेलच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधावा. कौटुंबिक संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिसांनी महसूल अधिका-यांसमवेत नियमितपणे बैठका घ्याव्यात. पती-पत्नीत समेट झाल्यानंतर या कुटुंबाच्या संपर्कात राहावे. त्यासाठी आवश्यकतेनुसार गृहभेट करावी. अमली पदार्थ प्रतिबंधासाठी उपाययोजना कराव्यात. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची मदत घ्यावी. पोक्सो कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील पीडितेचे समुपदेशन करावे.

