रेणापूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील कुंभारवाडी येथे शासनाच्या मान्यतेनुसार लातूर अँग्रो इंटेलिजन्स फार्मर प्रोड्युसर कंपनीची माती तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या ठिकाणी तालुक्यातील सर्व शेतक-यांना आपल्या शेतीच्या मातीचे परीक्षण करता येणार आहे. आता शेतक-यांना तालुक्यातून किंवा गावातून बाहेर न जाता थेट गावातच अचूक माती तपासणीची सुविधा मिळणार आहे.
शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसारच ही तपासणी होणार असल्याने शेतक-यांना अधिक विश्वासार्ह आणि दर्जेदार अहवाल मिळतील. येत्या काळात हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च आणि जमिनीची घटती सुपीकता यावर मार्गदर्शन मिळणार आहे. माती परीक्षणाची सोय उपलब्ध झाल्याने माती नमुना देण्यासाठी शेतक-यांना वारंवार लॅबमध्ये येण्याची गरज नसून शेतक-यांच्या सोयीसाठी कंपनीकडून प्रशिक्षीत मनुष्यबळ थेट शेतावर जाऊन योग्य पद्धतीने मातीचे नमुने घेतले जातील. या प्रयोगशाळेमुळे मातीच्या तपासणीसह अचूक खत शिफारस आणि शेतीचा खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याचा थेट फायदा मिळणार आहे.
जिल्ह्याचे मृदा संवर्धन अधिकारी राहूल औसेकर हे रेणापूर तालुक्यातील असल्याने यांचा फायदा संपूर्ण रेणापूर तालुक्यास होणार आहे. नियमीत मृदा तपासणीमुळे जमिनीतून नत्र, स्फुरद, पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रवांची कमतरता आणि पिएच सेंद्रीय कार्बन, क्षारता इत्यादी घटकांचे अचुक निदान करता येते. या आकडेवारीच्या आधारे शेतकरी गरजेपुरतेच खत व सुक्ष्म अन्नद्रव्ये वाढते, रोग किडीचा प्रादुर्भाव कमी होतो, रोग- किडीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि रासायनिक खर्चही लक्षणीय घटतो.

