नवी दिल्ली : प्रतिनिधी
कुत्र्यांच्या हल्ल्यात मुले किंवा वृद्ध जखमी झाल्यास किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास, राज्य सरकारने वेळीच पावले न उचलल्याबद्दल आम्ही मोठी भरपाई आकारु. तसेच, भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणा-यांचीही जबाबदारी निश्चित केली जाईल, असे आज (दि. १३) सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
देशातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या सुळसुळाटावर आणि त्यांच्यामुळे होणा-या त्रासावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संजय मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या विशेष खंडपीठासमोर आज पुन्हा सुनावणी झाली. न्या. नाथ यांनी स्पष्ट केले की, कुत्र्यांच्या हल्ल्यात मुले किंवा वृद्ध जखमी झाल्यास किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास, राज्य सरकारने वेळीच पावले न उचलल्याबद्दल मोठी भरपाई द्यावी लागेल. तसेच, भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणा-यांचीही जबाबदारी निश्चित केली जाईल. जर तुम्हाला त्यांची काळजी असेल, तर त्यांना घरी घेऊन जा. कुत्रे ठिकठिकाणी कचरा का पसरवत आहेत आणि लोकांना का चावत आहेत किंवा घाबरवत आहेत, याचा विचार होणे गरजेचे आहे.
आजच्या सुनावणीवेळी ज्येष्ठ वकील दातार यांनी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश विमानतळांपर्यंत लागू करण्याची विनंती खंडपीठाला केली. खंडपीठाने श्वानप्रेमींना झापले गुजरात उच्च न्यायालयात एका वकिलाला कुत्रा चावल्याच्या घटनेचा आणि जेव्हा अधिकारी कुत्र्यांना पकडण्यासाठी गेले तेव्हा त्यांना कशी मारहाण झाली, याचा उल्लेख खंडपीठाने केला. श्वानप्रेमी आणि प्राणी मित्रांच्या याचिकांच्या विरोधात ७ नोव्हेंबरचा आदेश विमानतळ आणि न्यायालयांपर्यंत वाढवण्याच्या मागणीला प्रतिसाद देताना न्यायालयाने ही टिप्पणी केली.

