ड्रोनच्या सहाय्याने क्लाउड सीडिंग
जालना : प्रतिनिधी
राज्यात यंदा दुष्काळाचे भीषण संकट असून ऑक्टोबर महिन्यातच बहुतांश जिल्ह्यात पाण्याचा साठा कमी झाला आहे. यंदाच्या हंगामात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे दुष्काळाचे मोठे संकट राज्यावर आणि शेतक-यांवर आले आहे. भीषण दुष्काळ, पाणीटंचाईचे अभूतपूर्व संकट या पार्श्वभूमीवर कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगाची चाचणी जालन्यात करण्यात आली. विशेष म्हणजे ड्रोनच्या सहाय्याने क्लाउड सीडिंगची प्रायोगिक चाचणी करण्यात आली.
जालन्यात स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राची चाचपणी झाली आहे. जालन्यात ड्रोनच्या सहाय्याने क्लाउड सीडिंगची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली. जवळपास ४०० मीटर उंचीवरून ढगांमध्ये क्षार-आधारित सीडिंग द्रव्याची फवारणी करण्यात आली. जालन्यात स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच असा प्रयोग करण्यात आल्याची माहिती अभ्यासक बळीराम बागल यांनी दिली. पारंपरिक विमानांच्या तुलनेत ड्रोनच्या माध्यमातून कमी खर्चात, विशिष्ट ठिकाणी आणि गरजेनुसार सीडिंग करता येऊ शकते का, याची पडताळणी या प्रयोगातून करण्यात येत आहे.
दरम्यान, विमानाच्या माध्यमातून सोडियम क्लोराइडची फवारणी करण्याचा खर्च मोठा असतो. त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून हा खर्च वाचवला जाऊ शकतो आणि ढगाच्या विशिष्ट उंचीवरती ड्रोन घेऊन हा प्रयोग करता येऊ शकतो का, याची चाचणी या माध्यमातून झाली आहे. त्यामुळे, प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेली ही चाचणी यशस्वी झाल्यास कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी हा नवा प्रयोग फायदेशीर ठरू शकतो.
















