लातूर : प्रतिनिधी
कृषि महाविद्यालय, लातूर येथे विद्यार्थी समुपदेशन व नियुक्ती कक्षाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पदव्युत्तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन संस्था, चाकूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे, कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, जिरेवाडीचे प्राचार्य डॉ. दिनेशसिंह चव्हाण, विद्यार्थी समुपदेशन व नियुक्ती कक्षाचे डॉ. विजय भामरे, अमर साखरे उपस्थित होते. नुकत्याच महाविद्यालयाच्या विद्यार्थी समुपदेशन व नियुक्ती कक्षामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या परिसर मुलाखतीद्वारे पदव्युत्तर विद्यार्थी सुशांत बिराजदार,पदवी विद्यार्थी गणेश पाटील, सौरभ गरुड, आदित्य गवळी, हर्षद घुगे, जानवी शिंदे आणि शुभम अंबुलगे यांची सहाय्यक प्रबंधक पदासाठी निवड झाली आहे.
तसेच शुभम जाधव, कौस्तुभ सरवदे, ऋतुजा राऊत आणि रोहिणी पुरी या चार विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्यस्तरीय समर यूथ समिटमध्ये सहभाग घेऊन कोअर टीम सदस्य म्हणून सन्मान प्राप्त केला. तसेच या समिटमध्ये कृषि महाविद्यालय, लातूर येथील यांच्या उपक्रमांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय, टेक्नोसर्व या बहुराष्ट्रीय कंपनीच्या वतीने महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थी सुशांत बिराजदार, प्रथमेश अडसूळ, बालाजी सांगळे, महेश पवार, मोहन होगे आणि जीवन धोत्रे यांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली. तसेच पदव्युत्तर विद्यार्थी विवेक हांडे यांची शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या ‘टप्प्याटप्प्याने रासायनिक शेतीकडून एकात्मिक शेतीकडे’ या प्रकल्पाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील फूड बज या नियतकालिकाने दखल घेत महाविद्यालयाच्या शाश्वत व एकात्मिक शेती क्षेत्रातील कार्याचा गौरव केला आहे. या उपक्रमात सहभागी असलेल्या आचार्य पदवीच्या विद्यार्थिनी प्रतीक्षा खेडकर व पदव्युत्तर विद्यार्थी सुशांत बिराजदार यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय भामरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. दयानंद मोरे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. राजेश शेळके, डॉ. पद्माकर वाडीकर, डॉ. प्रभाकर अडसूळ, डॉ. सुनिता मगर, डॉ. अजित पुरी, डॉ. अमोल मिसाळ, सुधीर सदार, नामदेव कटिंग तसेच पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
















