पुणे : संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देत कृषी अर्थव्यवस्थेला पाठबळ द्यावेच लागेल कारण कृषी अर्थव्यवस्थेला अव्हेरून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते, नियामक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरूड, कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे, मानद सचिव डॉ. सुजीत परदेशी आदी उपस्थित होते.
सीओईपी जीवनगौरव पुरस्कार अहमदाबाद येथील भगवती स्फेरोकास्ट चे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक ज्येष्ठ उद्योगपती पी.एन. भगवती यांच्या वतीने लोहिया यांनी स्वीकारला.गडकरी म्हणाले की, शेतकरी हा केवळ अन्नधान्याचा उत्पादक राहिलेला नसून तो ऊर्जादाताच्या भूमिकेतही शिरला आहे. कृषी क्षेत्रात देखील अनंत संधी दडलेल्या असून आपली इंधनाची सध्याची आणि भविष्यातली देखील गरज भागवण्याची क्षमता कृषी उद्योगात आहे. ग्रामीण भागाच्या गरजा आणि गरजवंतांचा मानवी चेहरा केंद्रस्थानी ठेवून संशोधन करीत तंत्रज्ञानाचा विकास झाल्यास ग्रामीण भागातून येणारे लोंढे गावातच थांबतील आणि त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
पुढील सहा महिन्यात मुंबई बंगळूर या १४ लेन महामार्गाचे काम सुरू होणार असून मुंबईतील अटल सेतू उतरला की थेट एक्स्प्रेस महामार्गाला लागता येणार आहे. हा महामार्ग थेट रिंग रोडशी जोडलेला असेल आणि यामुळे मुंबई- बंगळुरू प्रवास अधिक गतीने करता येईल. तसेच पुणे-औरंगाबाद हे अंतर केवळ दोन तासांवर येईल,असे ते म्हणाले विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते यांनी संघटनेची भूमिका विशद केली. प्रास्ताविक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरूड यांनी तर अंकीता संचेती आणि पियूष गिरगावकर यांनी सूत्रसंचालन केले. संघटनेचे मानद सचिव डॉ. सुजीत परदेशी यांनी आभार मानले.