पुणे : प्रतिनिधी
नाना पेठेतील टोळीयुद्धातून गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर याच्यावर गोळीबार करून पसार झालेल्या आंदेकर टोळीतील शिवम आंदेकरसह चौघांना गुजरात सीमेवरून अटक करण्यात आली होती. कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा आंदेकर हा अखेर पोलिसांना शरण आला. कृष्णा आंदेकर हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक आहे. आता आयुष कोमकर हत्या प्रकरणात कृष्णा आंदेकरचा जवळचा शूटर मुनाफ पठाण याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण अटक केलेल्या आरोपींची संख्या आता १४ झाली आहे.
आयुष कोमकर हत्या प्रकरणात फरार आरोपी मुनाफ पठाण याला केली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुनाफ पठाण याने पिस्टल पुरवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आज पठाणला कोर्टात हजर केले जाणार आहे. कोमकर खून प्रकरणात मुनाफ पठाणचा हात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही आरोपी करण्यात आले आहे. वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जो कट रचला त्यामध्ये मुनाफ पठाणही सहभागी होता. पठाण हा कृष्णा आंदेकरचा जवळचा शूटर आहे.
या प्रकरणी गुजरात सीमेवरून शिवम उदयकांत आंदेकर (३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (२१), शिवराज उदयकांत आंदेकर (२९) आणि माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०, सर्व रा. नाना पेठ) यांना अटक करण्यात आली होती. तर शरण आलेल्या कृष्णा आंदेकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी आयुष कोमकर हा लहान भावाला क्लासवरून घेऊन साडेसातच्या सुमारास नाना पेठेतील हमाल तालमीजवळ असलेल्या सोसायटीत आला. तळमजल्यावर दुचाकी लावत असताना आयुषवर पिस्तुलातून बेछूट गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला होता. याबाबत आयुषची आई कल्याणी (३७) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ आरोपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या १३ जणांना अटकही करण्यात आली आहे.
















