लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका आता अॅक्शन मोडवर आली आहे. मनपाच्या वतीने शहरात प्लास्टिक कॅरीबॅग जप्ती तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. कचरा टाकणारे आणि जाळणा-यावर कारवाई करण्यात येत असून संबंधितांकडून ३० हजार रुपये दंडाची वसुलीही करण्यात आली आहे.
महापौर श्रीमती जयश्री सोनकांबळे व मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांच्या निर्देशानुसार उपायुक्त वसुधा फड यांच्या मार्गदर्शनात शहरात ही मोहीम राबवली जात आहे.या अंतर्गत शहरातील झोन बी मध्ये औसा रोडवर अतिक्रमण करणारे व सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणा-या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.या कारवाईत २ किलो कॅरीबॅग जप्त करून १२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. शहरात इतर ठिकाणी देखील अशीच कारवाई करून एकूण १२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. उघड्यावर कचरा टाकणा-या व जाळणा-या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई केली जात आहे. उघड्यावर कचरा टाकणारे ३७ व कचरा जाळणा-या ५ नागरिकांवर मनपाने कारवाई केली.या अंतर्गत १८ हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली आहे.
या कारवाईत मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे, प्रमुख स्वच्छता निरीक्षक अक्रम शेख,शिवराज शिंदे, डी. एस.सोनवणे, रवी कांबळे यांच्यासह कर्मचा-यांनी सहभाग घेतला. शहरातील नागरिकांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळावा. कच-याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून तो घंटागाडीतच टाकावा. उघड्यावर कचरा टाकू नये तसेच जाळू नये,असे आवाहन महापौर श्रीमती जयश्री सोनकांबळे यांनी केले आहे.

